Bigg Boss 18: ग्रँड फिनालेच्या आधी लोकप्रिय स्पर्धक घराबाहेर; कोण जिंकणार ट्रॉफी?
'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले पार पडण्याआधी एका स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलंय. येत्या 19 जानेवारीला अठराव्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सात स्पर्धक राहिले आहेत.
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाचा प्रवास फिनालेच्या आधीच संपला आहे. घरात जवळपास 14 आठवडे राहिल्यानंतर अभिनेत्री चाहत पांडेला रविवारी शोमधून बाहेर पडावं लागलं. बिग बॉसच्या घरात चाहतने स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. मात्र त्यासाठी काही स्पर्धक तिला ‘फेक’ (बनावट) असंही म्हणायचे. पारंपरिक भारतीय मुलीची प्रतिमा चाहतने प्रेक्षकांसमोर मांडली आणि अनेकांना ती आवडली. टॉप 5 स्पर्धकांमध्ये चाहतचाही समावेश असेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र त्यापूर्वीच तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपुष्टात आला.
‘फॅमिली वीक’दरम्यान बिग बॉसच्या घरात चाहत पांडेची आई आली होती आणि यावेळी त्यांनी चाहतच्या खासगी आयुष्याबद्दल काही वक्तव्ये केली होती. चाहतचा कोणीच बॉयफ्रेंड नाही, ती माझ्या इच्छेनेच मी सांगेन त्या मुलाशी लग्न करणार, असं त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर चाहतचा बॉयफ्रेंड आहे हे सिद्ध केल्यास बिग बॉसला लाखो रुपयांचं बक्षीस देण्याचं खुल आव्हान तिच्या आईने दिलं होतं. शनिवारच्या एपिसोडमध्ये चाहतच्या डेटिंग लाइफबद्दल पुन्हा चर्चा झाली. मानस शाह नावाच्या व्यक्तीला ती डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र चाहतने पुन्हा या सर्व फेटाळल्या. चाहत पांडेनं ‘हमारी बहु सिल्क’, ‘दुर्गा- माता की छाया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. मध्यप्रदेशमध्ये तिचा जन्म झाला असून ती लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं.
View this post on Instagram
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. चाहत पांडेच्या एलिमिनेशननंतर आता बिग बॉसच्या घरात सात स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजल दलाल यांचा समावेश आहे. बिग बॉसचा हा नवीन सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘बिग बॉस 18’चे एपिसोड्स आणि ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर आणि जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. ग्रँड फिनालेचा एपिसोड रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होईल.