‘त्याच्याशी लग्न ही सर्वांत मोठी चूक’; ‘बिग बॉस 18’मधील स्पर्धकाच्या पूर्व पत्नीचं वक्तव्य चर्चेत
'पवित्र रिश्ता' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता करणवीर मेहरा सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. करणवीरची पूर्व पत्नी निधी सेठने एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाविषयी वक्तव्य केलंय. करणसोबतच्या लग्नाला तिने आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याचं म्हटलंय.
‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा ‘बिग बॉस 18’मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचला. बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर तो पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. करणवीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणवीरच्या पूर्व पत्नीने त्याच्यासोबतच्या लग्नाला ‘आयुष्यातील सर्वांत मोठी चूक’ असं म्हटलंय. निधी आणि करणने 2021 मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच या दोघांमध्ये खटके उडायला लागले आणि अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निधी म्हणाली, “ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. आमच्यात काहीच ठीक नाही, हे जेव्हा मला समजतं तेव्हाच मी घरातून बाहेर पडले. दुर्दैवाने या जगात ठराविक स्वभावाविषयी किंवा वागणुकीविषयी फारशी जागरुकता नाही, ज्यामुळे नातेसंबंध कायमचे बिघडू शकतात. आम्ही वर्षभरापूर्वीच विभक्त झालो. एखाद्या नात्यात दररोजची भांडणं सहन होत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र राहूच शकलो नसतो. मानसिक शांती, एकमेकांविषयी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं लग्नासाठी खूप महत्त्वाचं असतं. नात्यातील विषारीपणा एका मर्यादेपलीकडे सहन करू नये असं मला वाटतं.”
View this post on Instagram
करणवीरसोबत राहणं अशक्य झाल्याचं निधीने या मुलाखतीत म्हटलंय. याआधी दिलेल्या मुलाखतीत करणनेही निधीबाबत हेच म्हटलं होतं. एकमेकांना सहन करू न शकल्याने घटस्फोट घेतल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘बिग बॉस 18’मध्ये सलमान खानसोबत बोलताना करण म्हणाला, “जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा एकमेकांवर आरोप केले जातात. नंतर काही वर्षांनी याची जाणीव होते की माझी पण चूक होती. मी नातं जपणाऱ्यांपैकी आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी ‘खतरों के खिलाडी’ आहे, त्यामुळे मी गर्लफ्रेंड बनवत नाही, थेट लग्न करतो.”
करणवीर आणि निधीची पहिली भेट 2008 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर पुढील तीन वर्षांत दोघांनी काही प्रोजेक्ट्ससाठी एकत्र काम केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर करणवीर निधीला डेट करू लागला आणि दोघांनी 2021 मध्ये लग्न केलं. करणवीर मेहराचं निधीसोबतचं हे दुसरं लग्न होतं. याआधी त्याने 2009 मध्ये बालमैत्रीण देविकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.