‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची धमाकेदार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 27 मे पासून सुरु होणाऱ्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम विशाल निकम हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्यासोबत बिग बॉसमधलाच आणखी एक अभिनेता दिसणार आहे.
येत्या 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची झलक पहायला मिळाली. त्यानंतर आता लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्स्पेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे राहतो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो. पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो, पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअॅलिटी शोज गाजवलेला हा लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे मालिकेत जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.
अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, “मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्टीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे.”
View this post on Instagram
“आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे,” असं तो पुढे म्हणाला. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका येत्या 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.