मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता अक्षय केळकर या सिझनचा विजेता ठरला. अक्षयला बिग बॉस मराठीची ट्रॉफी आणि त्यासोबतच बक्षीस म्हणून 15 लाख 55 हजार रुपये मिळाले. यासोबतच त्याला स्पॉन्सर्सकडून सोन्याची चेन आणि बेस्ट कॅप्टन ठरल्यामुळे पाच लाख रुपये मिळाले. अंतिम फेरीत अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोघांमध्ये टक्कर झाली. अपूर्वा दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर अक्षयने विजेतेपद पटकावलं.
अभिनेते किरण माने हे अंतिम फेरीत तिसऱ्या क्रमांकावर होते. टॉप 5 स्पर्धकांमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी सावंत यांचा समावेश होता. त्यापैकी अमृताला घराबाहेर पडावं लागलं आणि राखीने 9 लाख रुपये स्वीकारून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये स्पर्धक 100 दिवस घरातील कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत होते.
अक्षयने हिंदी टीव्ही शोजमध्ये काम केलंय. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच तो तगडा स्पर्धक मानला जात होता. तीन महिन्यांपूर्वी तो बिग बॉसच्या घरात सर्वांत लोकप्रिय स्पर्धक म्हणून सहभागी झाला. घरातील स्पर्धकांसोबतच्या भांडणांमुळे आणि त्याच्या वक्तव्यांमुळे तो कायम चर्चेत राहिला. अक्षय या शोचा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणूनही ओळखला जातो.
BIGG BOSS मराठी” सीझन 4 चा विजेता आहे “अक्षय केळकर” ?♥️
#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #BBMarathi@BiggBossMarathi pic.twitter.com/WaENB1obuE— Colors Marathi (@ColorsMarathi) January 8, 2023
विशेष म्हणजे या संपूर्ण सिझनमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी अक्षयचीच सर्वाधिक शाळा घेतली होती. घरातील इतर स्पर्धकांसोबत हाणामारी केल्यामुळे तो चर्चेत असायचा. खेळाडूवृत्ती, प्रत्येक टास्कमधील मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.