नऊ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणारी रेशम टिपणीस घटस्फोटाबद्दल म्हणाली “मला पश्चात्ताप..”
अभिनेत्री रेशम टिपणीस एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. रेशम गेल्या नऊ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. त्याआधी तिने संजीव सेठशी लग्न केलं होतं.
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री रेशम टिपणीस अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. तिने 1993 मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता संजीव सेठशी लग्न केलं होतं. या दोघांना ऋषिका ही मुलगी आणि मानव हा मुलगा आहे. मात्र रेशम आणि संजीव यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजीवने ‘ये रिश्ता..’ फेम अभिनेत्री लता सबरवालशी दुसरं लग्न केलं. एका मुलाखतीत रेशम तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मला घटस्फोटाचा पश्चात्ताप आहे, असं ती या मुलाखतीत म्हणाली होती.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रेशम म्हणाली, “मला माझ्या घटस्फोटाचा पश्चात्ताप होतो. जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा मी 20 वर्षांची होती. त्यानंतर मी लगेच आई झाली. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्याइतकी सक्षम आणि समजूतदार मी नव्हते. संजीव आणि माझ्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. आम्हा दोघांना वाटतं की त्यावेळी जर आम्ही मॅच्युअर असतो तर आमचा घटस्फोट कधीच झाला नसता.” आता रेशम आणि संजीव यांची दुसरी पत्नी लता सबरवाल यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. या मुलाखतीत रेशमला दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तिने स्पष्ट नकार दिला.
View this post on Instagram
रेशम गेल्या नऊ-दहा वर्षांपासून संदेश किर्तीकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. “लग्नामुळे माझ्या गळ्यात फक्त एक मंगळसूत्र राहील. यापेक्षा वेगळा काही बदल होणार नाही”, असं मत रेशमने मांडलं होतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “आम्हा दोघांना लग्नाची काहीच घाई नाही. लग्नानंतर आमच्यात एकमेव बदल होईल, तो म्हणजे माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल. बाकी सर्व आमच्यात जसं आहे तसंच राहणार आहे. आम्हाला मुलाबाळांसाठीही लग्न करण्याची गरज नाही. आमच्यात सध्या सर्वकाही ठीक चालू आहे. लग्न करून या गोष्टी मला आणखी खराब करायच्या नाहीत.”