महेश मांजरेकर नव्हे तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कलर्स मराठीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण अखेर जवळ आला आहे. कलर्स मराठी आणि ‘जिओ सिनेमा’वर ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राइजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नव्हे तर बॉलिवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुखची झलक पहायला मिळतेय. या नव्या सिझनचं हे नवं सरप्राइज असून यंदा एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. ‘बिग बॉस मराठी’चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचला. प्रेक्षकांना मराठीतही हा कार्यक्रम प्रचंड आवडला. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार सिझनने प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
View this post on Instagram
बिग बॉसचं घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची आणि कुतूहलाची बाब असते. बिग बॉस मराठीचं हे आलिशान घर आकार घेऊ लागलं आहे. तसंच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
‘बिग बॉस’ हा शो मराठीत सुरू झाल्यापासून निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच या शोचं सूत्रसंचालन केलं. हिंदीत सलमानला जितकी लोकप्रियता मिळाली, तितकीच मराठी महेश मांजरेकर यांना ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे रितेश देशमुखसमोर मोठं आव्हान असेल. या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात अनेकांनी महेश मांजरेकरांचा उल्लेख केला आहे. आता रितेश त्यांची जागा घेऊ शकेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.