वानखेडेवर विराट कोहली अन् सूरज चव्हाण समोरासमोर आले तेव्हा..; पहा व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाण पहिल्यांदाच क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेला होता. यावेळी त्याच्या आगामी 'झापुक झुपूक' या चित्रपटातील गाणं स्टेडियमवर जोरात वाजलं. किंग कोहलीसुद्धा सूरजसमोर आला, तेव्हा चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘झापूक झुपक’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून नुकतंच त्यातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. याच गाण्याच्या प्रमोशनसाठी आता सूरज आणि चित्रपटाची टीम मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती. आयपीएल मॅचदरम्यान सूरजचं ‘झापूक झुपूक’ हे गाणं संपूर्ण स्टेडियमवर वाजलं. त्याचदरम्यानचा एक व्हिडीओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत क्रिकेटर विराट कोहलीने सर्वांचं लक्ष वेधलंय.
मुंबई इंडियन्सची जर्सी आणि हटके लूकमध्ये सूरज आयपीएलची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. या मॅचदरम्यान जेव्हा सूरजसमोर क्रिकेटर विराट कोहली आला, तेव्हा तो क्षण अनेकांसाठी खास ठरला. विराटला पाहून सूरज अत्यंत खुश झाला. स्टेडियमवर सूरजचं ‘झापूक झुपूक’ हे गाणं वाजलं आणि त्यावेळी विराट कोहली सूरजसमोर आला, तेव्हा चाहत्यांनी जल्लोष केला. सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.




View this post on Instagram
‘किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरासमोर.. पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो आणि आपल्या भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला. बाकी स्टेडियममधे ‘झापुक झुपूक’ खऊन वाजलंय,’ असं कॅप्शन सूरजने या व्हिडीओला दिलं आहे. सूरज पहिल्यांदाच एखादी मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर गेला होता. याच मॅचदरम्यान विराटला अगदी जवळून पाहता आल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
‘झापूक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं वेगळं असं छान विश्व निर्माण केलंय. त्यामुळे सूरजचे चाहते त्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ ही कौटुंबिक आणि मनोरंजनाने भरपूर अशी एक धमाल लव्हस्टोरी आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.