Abhishek Malhan | चाहतेच ठरतायत डोकेदुखी; ‘फुकरा इन्सान’च्या कारवर जमावाचा हल्ला, आई नाराज
'बिग बॉस ओटीटी 2'च्या ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेला प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान याच्यावर त्याचेच चाहते भारी पडले आहेत. अभिषेकची भेट घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी त्याच्या महागड्या गाडीची तोडफोड केली.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : सलमान खानच्या ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अभिषेक मल्हान ऊर्फ फुकरा इन्सान सध्या जिया शंकरसोबतच्या एका प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. अभिषेक, जिया शंकर आणि बिग बॉसचा विजेता एल्विश हे तिघं या नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. यादरम्यान अभिषेकच्या कारवर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेकच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी आता बिग बॉस ओटीटीची माजी स्पर्धक बेबिका धुर्वे त्याच्या मदतीला धावून आली आहे. बेबिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अभिषेक मल्हानच्या कारप्रकरणाची पोस्ट शेअर केली आहे.
‘मी नुकतीच एक पोस्ट वाचली आहे. काही हेटर्सनी मिळून अभिषेकच्या कारची तोडफोड केली आहे. हे सर्व पाहून मी खूप नाराज आहे. बिग बॉसचे स्पर्धक विनाकारण द्वेषाचा सामना करत आहेत. विशेषकरून अभिषेक. त्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. कृपया त्याच्याविरोधात द्वेष पसरवू नका. सर्वजण शो संपल्यानंतर आपापल्या आयुष्यात चांगलं काहीतरी करत आहेत. कृपया तुम्हीसुद्धा प्रेम आणि आनंदाने वागा’, असं तिने लिहिलं आहे.
View this post on Instagram
चाहतेच पडले भारी
अभिषेक मल्हानवर त्याची स्वत:चीच फॅन फॉलोईंग भारी पडल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतल्यानंतर त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अभिषेकची भेट घेण्यासाठी काहीजण त्याच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्याच्याशी भेट होऊ न शकल्याने त्यांनी घराची सुरक्षाभिंत ओलांडून कारवर हल्ला केला. या घटनेबद्दल अभिषेकची आई डिंपल यांनीसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही. अभिषेक घरी नाही, हे मी त्यांना वारंवार सांगत होते”, असं त्या म्हणाल्या.
अभिषेकची कमाई
युट्यूबवर अभिषेकचा खूप मोठा चाहतावर्ग असून त्याच्या चॅनलचे सध्या 7.43 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. युट्यूबच्या रेव्हेन्यू चार्टनुसार, एखादा युट्यूबर विविध स्रोतांमधून कमाई करू शकतो. त्यापैकीच मुख्य स्रोत म्हणजे अर्थातच जाहिराती. जाहिरातींच्या माध्यमातून त्याला प्रत्येक हजार व्ह्यूजसाठी जवळपास 3 (248 रुपये) ते 5 डॉलर (414 रुपये) मिळतात. याशिवाय तो चॅनल सबस्क्रिप्शन, स्वत:चा ब्रँडेड व्यापार यातूनही कमाई करतो.