झक्कास! अनिल कपूर यांच्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी 3’ला अच्छे दिन, मिळाले इतके व्ह्यूज
अनिल कपूर सूत्रसंचालन करत असलेल्या 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिझनने मागच्या सिझनला मागे टाकलं आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनच्या तुलनेत या सिझनला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन हा अगदी पहिल्या एपिसोडपासूनच तुफान चर्चेत आहे. या सिझनची प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता होती, कारण त्याचं सूत्रसंचालन अभिनेते अनिल कपूर करणार असल्याची घोषणा झाली होती. असं असलं तरी सलमान खानचे चाहते काही अंशी नाराज झाले होते. अनिल कपूर सलमानची जागा घेऊ शकणार का, असे प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात होते. मात्र अनिल कपूर यांच्या अनोख्या अंदाजाने सर्वांची मनं जिंकली आहेत. याचा पुरावाच आता समोर आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तीन आठवड्यांत ‘बिग बॉस ओटीटी 2’ला जितके व्ह्यूज मिळाले होते, त्याच्यापेक्षा 30.4 दशलक्ष जास्त व्ह्यूज या तिसऱ्या सिझनला मिळाले आहेत.
Ormax च्या सर्वेक्षण अहवालानुसार, ‘बिग बॉस OTT 2’ च्या तुलनेत अनिल कपूर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या तिसऱ्या सिझनने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये तब्बल 5.3 दशलक्ष व्ह्यूज नोंदवले आहेत. तर दुसऱ्या सिझनने 2.4 दशलक्ष व्ह्यूज नोंदवले होते. इतकंच नाही तर ‘बिग बॉस ओटीटी 3’ला तीन आठवड्यांत 42% जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
‘Bigg Boss OTT 3’चे व्ह्यूज-
ओपनिंग वीकेंड: 5.3 दशलक्ष व्ह्यूज पहिला आठवडा: 8.8 दशलक्ष व्ह्यूज दुसरा आठवडा: 7.9 दशलक्ष व्ह्यूज तिसरा आठवडा: 8.4 दशलक्ष व्ह्यूज एकूण: 30.4 दशलक्ष व्ह्यूज
‘Bigg Boss OTT 2’चे व्ह्यूज
ओपनिंग वीकेंड: 2.4 दशलक्ष व्ह्यूज पहिला आठवडा: 6.8 दशलक्ष व्ह्यूज दुसरा आठवडा: 6.2 दशलक्ष व्ह्यूज तिसरा आठवडा: 6.0 दशलक्ष व्ह्यूज एकूण: 21.4 दशलक्ष व्ह्यूज
View this post on Instagram
अनिल कपूर हे त्यांचं व्यक्तिमत्त्व, अभिनयकौशल्य, स्टाइल आणि नवोदित कलाकारांसोबत जुळवून घेण्याची कला यात कुठेच कमी पडत नाहीत. बिग बॉसच्या सूत्रसंचालकपदी सलमानच्या जागी त्यांची निवड झाल्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सलमानची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं ते ठामपणे म्हणाले. बिग बॉसचं सूत्रसंचालन करण्यासाठी कोणत्या गोष्टी नव्याने शिकल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींबद्दल जागरूक असलं पाहिजे याविषयी त्यांनी नीट अभ्यास केला आहे. बिग बॉसच्या घरातली भांडणं सोडवताना सूत्रसंचालकाचा कस लागतो. त्याची भूमिका त्यात महत्त्वाची असते. त्यामुळे मुळात घरात घडणारी भांडणं कशातून येतात, याचा विचार केल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.