रस्त्यावर ओरडत राहा..; ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये वडापाव गर्लला पाहून भडकली अभिनेत्री
'गोपी बहू'च्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने बिग बॉस आणि दिल्लीची प्रसिद्ध वडापाव गर्लवर निशाणा साधला आहे.
‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय पत्रकार दीपक चौरसिया आणि दिल्लीची व्हायरल ‘वडापाव गर्ल’सुद्धा स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये दाखल होणार आहे. स्पर्धकांची नावं समोर आल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने बिग बॉसवर आणि वडापाव गर्लवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धकांची निवड कशी होते, त्यासाठी कुठे ऑडिशन द्यावं लागतं, असा प्रश्न कोणाला पडत असेल तर त्याचं उत्तर देवोलीनाने तिच्याच अंदाजात दिलं आहे.
देवोलीनाची पोस्ट-
‘जे लोक मला विचारतायत की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं? कुठे ऑडिशन द्यावी लागते? त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. तसं पहायला गेलं तर आमच्या वेळी असं काहीच नव्हतं. वेळ बदलली, भावना बदलल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मी हे ठामपणे सांगू शकते की रस्त्यावर सातत्याने महिनाभर ओरडत राहा, भांडण करत राहा, 1-2 कानाखाली मारल्यानंतर तुम्हाला पोलीस ठाण्यात जावं लागेल. याने तुमच्या प्रसिद्धीला आणखी चार चांद लागतील. त्यानंतर स्वत:ला व्हायरल करा. आजकाल बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. तुमचा व्हिडीओ बनवण्यासाठी ब्लॉगर्सना बोलवून घ्या आणि हो ड्रामा खूप गरजेचं आहे. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला शिव्या घालू लागतील, तेव्हा समजून जा की तुमची बिग बॉसमध्ये निवड झाली आहे,’ असं तिने खोचकपणे लिहिलंय. देवोलीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. देवोलीनासुद्धा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
कोण आहे वडापाव गर्ल?
दिल्लीची वडापाव गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होतेय. ती तिच्या वडापावच्या गाडीमुळे आणि भांडणांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वडापावच्या गाडीवरून तिला त्रास देणाऱ्या लोकांविषयी ती काही व्हिडीओंमध्ये रडत बोलताना दिसून येते. कधी ती लोकांशी भांडणं करते तर कधी रडतानाचे व्हिडीओ पोस्ट करते. भांडणांमुळे तिला तुरुंगातही जावं लागलं आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहून अनेक फूड व्लॉगर तिचा व्हिडीओ शूट करण्यासाठी जायचे. त्यातूनच तिला प्रसिद्धी मिळाली.