मुंबई: तुम्ही असा एखादा रिॲलिटी शो पाहिला आहे का, ज्यात बक्षिसाची रक्कम ही ‘शून्य’ रुपये असेल? नसेल पाहिला तर बिग बॉस 16 चं उदाहरण आपल्यासमोर आहे. रिॲलिटी शोमध्ये आणलेला हा नवीन ट्विस्ट पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अवाक् झाले आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षकांनी या नव्या ट्विस्टवर राग व्यक्त केला आहे. टीआरपीसाठी निर्मात्यांनी पुन्हा काहीतरी फेक फंडा आणला असल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलंय.
बिग बॉस 16 चा टीआरपी वाढविण्यासाठी यात नवनवीन ट्विस्ट आणले जात आहेत. मात्र हे ट्विस्ट फेक असल्याने प्रेक्षकांचा संताप होतोय. फेक एविक्शन, फेक एलिमिनेशन, बझर टास्क यांसारखे उपाय आतापर्यंत केले गेले. इतकंच नव्हे तर वाइल्ड कार्ड एण्ट्रीवरूनही मस्करी करण्यात आली.
बझर टास्कदरम्यान बिग बॉसने शालीन भनोटच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्या स्पर्धकांवर निशाणा साधला. आधी टीनाला शालीनच्या माध्यमातून घराबाहेर काढलं. एका दिवसानंतर टीनाला शालीनच्याच माध्यमातून पुन्हा शोमध्ये परत आणलं गेलं. बझर टास्कमुळे प्रेक्षकांमध्ये सुरुवातीला उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्याचे परिणाम पाहिल्यानंतर प्रेक्षक निराश झाले.
टीनाच्या फेक एविक्शनमुळे चाहते आधीच नाराज झाले आहेत. त्यात आता बक्षिसाच्या रकमेचा ट्विस्ट आणला गेला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आता पुन्हा एकदा 50 लाख रुपये जमा करण्याची संधी मिळणार आहे. जर ही बक्षिसाची रक्कम परत येणार असेल तर ती शून्य केलीच का, असा सवाल प्रेक्षक करत आहेत.
या सिझनमध्ये दोनदा असं घडल्याचं पहायला मिळालं. अशा पद्धतीचे फेक ट्विस्ट शोमध्ये आणण्यापेक्षा टास्क चांगले आणा, अशी मागणी नेटकरी करत आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांची प्लॅनिंग फ्लॉप ठरत असल्याचंही अनेकांनी म्हटलंय.