Year Ender 2022: 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनच्या नावाने माजली होती खळबळ; काय आहे संपूर्ण प्रकरण?
जॅकलिन फर्नांडिसचं खंडणीखोर सुकेशवर प्रेम जडलं तरी कसं? संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारी अजब लव्ह-स्टोरी
मुंबई: 2022 हे वर्ष अंतिम टप्प्यात आलं आहे. या वर्षभरात आतापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. यातील काही घडामोडींनी मोठा धक्का दिला. बॉलिवूड इंडस्ट्रीतही या वर्षात बऱ्याच वादग्रस्त गोष्टी घडल्या. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून झालेला वाद, रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट, आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर झालेली बॉयकॉटची मागणी, त्यातच आमिरने घेतलेला इंडस्ट्रीतून ब्रेक, ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा वाद.. अशा अनेक वादग्रस्त घडामोडी या वर्षभरात घडल्या. यात सर्वांत मोठा धक्का देणारी घटना म्हणजे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतचं कनेक्शन. सुकेश आणि जॅकलिनचे प्रायव्हेट फोटो जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे अजूनही जॅकलिनची ईडीकडून चौकशी सुरू आहे. तिला भारताबाहेर जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागत आहे. या वर्षभरात गाजलेलं हे मोठं प्रकरण नेमकं आहे तरी काय ते जाणून घेऊयात..
200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात असलेला कथित आरोपी सुकेश चंद्रशेखर याची जेव्हा चौकशी झाली, तेव्हा जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन मोठ्या अभिनेत्रींची नावं समोर आली. सुरुवातीला झालेल्या चौकशीत जॅकलिनने सुकेशसोबतचं नातं साफ नाकारलं. मात्र ईडीने जेव्हा पुराव्यांसह प्रश्न विचारले, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या. जॅकलिन सुकेशच्या प्रेमात होती, हे नंतर सुकेशनेच स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर या दोघांचे प्रायव्हेट फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सुकेशने दाखवली चुकीची ओळख
जॅकलिनने खुलासा केला होता की, जेव्हा तिने सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःची ओळख सन टीव्हीचा मालक असल्याचं सांगितलं होतं. आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून त्या चेन्नई इथल्या असल्याचंही त्याने सांगितलं. जॅकलिन म्हणाली, सुकेश म्हणाला होता की तो माझा खूप मोठा चाहता आहे. सन टीव्हीचे अनेक प्रोजेक्ट्स त्याच्याकडे असून मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावं, अशी अपेक्षा त्याने जॅकलिनकडे व्यक्त केली. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.
सुकेशने जॅकलिनला अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला. 17 ऑगस्ट 2022 रोजी ईडीने दिल्ली कोर्टात खंडणी प्रकरणात चार्जशीट दाखल केला होता. यात त्यांनी जॅकलिनला आरोपी म्हटलं होतं.
जॅकलिनला कोणकोणत्या महागड्या भेटवस्तू मिळाल्या?
Gucci, Chanel, Yves Saint Laurent, Dior या महागड्या ब्रँडच्या 4 बॅग्स, Louis Vuitton and Louboutin या महागड्या ब्रँडच्या तीन शूज, Gucci चे दोन आऊटफिट्स, परफ्युम, चार मांजरी, मिनी कूपर कार, दोन डायमंडच्या अंगठ्या, एक मल्टी-कलर डायमंडची ब्रेसलेट.. अशा विविध भेटवस्तू सुकेशकडून जॅकलिनला मिळाल्या होत्या. या सर्व भेटवस्तूंची किंमत जवळपास 10 कोटींच्या घरात आहे. यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची पर्शियन मांजर यांचाही समावेश आहे.
जॅकलिन आणि सुकेश यांची फक्त दोनदा चेन्नईत भेट झाली होती. जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीत हे फोनवरूनच एकमेकांच्या संपर्कात होते. सुकेशला 215 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक झाली असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे. फार्मास्युटिकल कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक अदिती सिंग आणि शिविंदर सिंग यांच्याकडून त्याने ही खंडणी मागितली होती.
अक्षय, सलमानने जॅकलिनला आधीच बजावलं होतं?
सुकेशच्या प्रेमात असलेल्या जॅकलिनने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा सलमान खान आणि अक्षय कुमारकडे बोलून दाखवली होती. मात्र त्या दोघांनी तिला त्याच्याविरोधात इशारा दिला होता. या चौकशीचा भाग असलेल्या एका वरिष्ठ पोलिसांनी याबद्दल सांगितलं होतं, “सहकलाकारांनी तिला सुकेशपासून लांबच राहण्यास बजावलं होतं. मात्र तरीही ती त्याला भेटत होती आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारत होती.”
जॅकलिनसोबतच्या नात्यावर सुकेशचा खुलासा
काही दिवसांपूर्वी सुकेशने तुरुंगातून त्याच्या वकिलासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने जॅकलिन निर्दोष असल्याचं म्हटलं होतं. ‘या प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवणं दुर्दैवी आहे. आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याच नात्याने मी जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिले होते. यात जॅकलिनचा काय दोष? जॅकलिनने माझ्याकडून कधीच काही मागितलं नाही. मी तिच्यावर प्रेम करावं आणि नेहमी तिच्यासोबत राहावं, एवढीच तिची अपेक्षा होती. मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून तिला भेटवस्तू दिल्या होत्या. कोर्टासमोर मी या सर्व गोष्टी सिद्ध करेन’, असंही त्याने म्हटलं होतं.