आयुष्यात जे चुकीचं घडलं..; बॉबी देओलने सांगितला ‘तो’ नकारात्मक अनुभव
अभिनेता बॉबी देओल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. व्यसनाधीन झालेल्या बॉबीची त्याच्या कुटुंबीयांना खूप चिंता वाटत होती. आयुष्यातील त्या नकारात्मक टप्प्याविषयी बॉबीने या मुलाखतीत सांगितलं.
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयकौशल्याने बॉबी देओलने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटापूर्वीची काही वर्षे बॉबीसाठी फार कठीण गेली होती. हाती काम नसल्याने तो दारूच्या आहारी गेला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला की, “आयुष्यात जे काही चुकीचं घडलं, त्याला कुरवाळत बसून प्रत्येक गोष्टीचा पश्चात्ताप करू शकत नाही. कारण आयुष्यातील तो काळसुद्धा माणसाला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. पण त्यातून बाहेर पडण्याची इच्छाशक्ती माणसातच असायला हवी.”
काय म्हणाला बॉबी?
या मुलाखतीत बॉबीला जेव्हा त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही जे काही चुकीचं केलं, त्याबद्दल पश्चात्ताप करत बसू शकता. पण त्या चुकांमधून तुम्ही कसं शिकणार? तुम्हाला त्या सर्व गोष्टींमधून बाहेर यावं लागतं. तुम्ही ते करू शकता. कोणीच तुमचा हात धरून हे शिकवणार नाही. माझे जे चाहते त्या वाईट काळातून जात आहेत, त्यांना मी त्यातून कसं बाहेर यायचं हे सांगू शकत नाही. कारण त्यांनाच माहित असतं की त्यातून कसं बाहेर पडायचं? त्या टप्प्यातून कसं बाहेर पडायचं हे प्रत्येकाला माहीत असतं. तुम्हाला फक्त स्वत:वर विश्वास ठेवावा लागतो.”
View this post on Instagram
“प्रत्येकाला कमजोर असल्यासारखं वाटतं. आपल्याला हे जमणार नाही, असं प्रत्येकाला वाटतं. हे खूप कठीण आहे, यातून मी बाहेर पडू शकत नाही, असे विचार मनात येतात. पण हा काळ म्हणजे वाहत जाण्यासारखा असतो आणि लोक स्वत:ला त्यात वाहू देतात. पण प्रत्येकजण त्यातून पोहून वर येऊ शकतो असं मला वाटतं. काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. अखेर तो महत्त्वाचा सूर गवसला तुम्हाला आत्मविश्वास येऊ लागतो. माझ्या घरातील सर्वांना माझ्याविषयी खूप चिंता वाटत होती. ते सतत मला प्रेरणा द्यायचे. पण जेव्हा मी स्वत:ला त्रास करून घेत होतो, तेव्हा मला त्यांच्या डोळ्यातील दु:ख दिसत होतं. ते मला फक्त त्यांच्या शब्दांनी समजावण्याचा प्रयत्न करू शकत होते. त्यापलीकडचे प्रयत्न हे मलाच करायचे होते”, अशा शब्दांत बॉबी व्यक्त झाला. मुलांखातर त्या व्यसनातून बाहेर पडल्याचा खुलासा बॉबीने केला.
ॲनिमल या चित्रपटानंतर बॉबीच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल पहायला मिळत आहेत. तो लवकरच आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या ‘अल्फा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो सूर्यासोबत ‘कंगुवा’ या चित्रपटातही काम करणार आहे.