‘ॲनिमल’च्या क्लायमॅक्सविषयी बॉबी देओलकडून मोठा खुलासा; रणबीरसोबतचा तो सीन दिग्दर्शकांनी काढून टाकला
'ॲनिमल' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता बॉबी देओलने क्लायमॅक्सविषयी महत्त्वाचा खुलासा केला. क्लायमॅक्समधील एक सीन दिग्दर्शकाने फायनल कटदरम्यान काढून टाकला होता.
मुंबई : 13 डिसेंबर 2023 | सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ याच चित्रपटाचा बोलबाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता बॉबी देओलने चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल मोठा खुलासा केला. क्लायमॅक्समध्ये बॉबीने साकारलेला अबरार आणि रणबीर कपूरने साकारलेला रणविजय यांच्यात मोठा ॲक्शन सीन दाखवला गेलाय. मात्र त्याशिवाय दिग्दर्शकांनी त्यात आणखी एक सीन शूट केला होता. हा सीन नंतर फायनल कटच्या वेळी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी काढून टाकला. मात्र ओटीटीवर ‘ॲनिमल’ प्रदर्शित झाल्यानंतर तो सीन प्रेक्षकांना पहायला मिळू शकतो, असंही बॉबीने सांगितलं आहे.
‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने सांगितलं, “या दोघा भावंडांना एकमेकांचा जीव घ्यायचा आहे. पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमसुद्धा आहे. या क्लायमॅक्स सीनमध्ये दोन भावंडांच्या किसचाही सीन होता. मात्र दिग्दर्शकाने तो सीन फायनल कटमध्ये काढून टाकला. पण कदाचित नेटफ्लिक्सवर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल, तेव्हा तुम्हाला तो सीन पहायला मिळू शकेल.” ‘ॲनिमल’च्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यातील काही सीन्स स्त्रीविरोधी असल्याचीही टीका करण्यात आली आहे. मात्र हा चित्रपट जगातील क्रूरतेबद्दल जागरुकता निर्माण करतोय, अशी प्रतिक्रिया बॉबीने टीकाकारांना दिली.
View this post on Instagram
‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, सुरेश ओबेरॉय, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत. 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षक-समिक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.
या चित्रपटात रणविजय सिंह आणि त्याचे वडील बलबिर सिंह यांच्यातील बिघडलेलं नातं आणि गँगस्टर विश्वाची एक वेगळीच बाजू दाखवली आहे. यामध्ये बॉबीची एण्ट्री ही मध्यांतरानंतर बऱ्याच काळाने होते. मर्यादित वेळेतही त्याने उत्तम काम केल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. या भूमिकेविषयी बॉबी एका मुलाखतीत म्हणाला, “चित्रपटात मी साकारत असलेला अबरार हा सूडासाठी पछाडलेला असतो. त्यामुळे ती भूमिका साकारताना मी माझ्या मनात कोणाचीच छवी निर्माण केली नाही. एखादा रानटी खलनायक कसा असतो, त्या हिशोबाने मी ही भूमिका साकारली. चित्रपटातील माझी भूमिका किती वेळ असेल याचा मी जराही विचार केला नव्हता. कारण भूमिका कितीही वेळाची असली तरी त्यात आपली वेगळी छाप सोडणं महत्त्वाचं असतं.”