Raghav Chadha | राघव चड्ढाच्या सुरक्षेवर अभिनेत्याकडून प्रश्न उपस्थित; म्हणाला ‘आमच्याच पैशाने..’
अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतीच आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढाशी लग्नगाठ बांधली. राघवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत एका बॉलिवूड अभिनेत्याने सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केला. सर्वसामान्यांच्या पैशांवर हे राजकारणी राजासारखे जगत असल्याचं त्याने म्हटलंय.
मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर सध्या परिणीती-राघवच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्याने राघवचा एक व्हिडीओ ‘X’वर (ट्विटरवर) पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने राघव चड्ढाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
राघव चड्ढाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर. खान ऊर्फ केआरके आहे. त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये राघव उदयपूर एअरपोर्टवरून बाहेर निघताना दिसत आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूला मोठा बंदोबस्त दिसून येत आहे. या व्हिडीओसोबत केआरकेनं लिहिलं, ‘सांगा बरं, या आम आदमीलाच आम आदमीपासून भीती वाटू लागली आहे. आपल्या चुकीमुळेच हे राजकारणी आपल्या कराच्या पैशाने राजासारखं आयुष्य जगतायत.’
पहा व्हिडीओ
Batao Ji, Ye Aam Aadmi Ko Bhi Aam Aadmi Se Darr Lagne Laga. These politicians are living King’s life with our Tax money because of our mistake only. pic.twitter.com/C1y6QojAWG
— KRK (@kamaalrkhan) September 24, 2023
केआरकेच्या या ट्विटवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘सर्व नेते एकसारखेच असतात. बोलतात काही एक आणि करतात वेगळंच’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतकी सुरक्षाव्यवस्था तर मुख्यमंत्र्यांसोबतही नसते. हा तर फक्त राज्यसभेचा खासदार आहे. यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. याआधी शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिम्रत कौर बादल यांनी लग्नात पंजाब पोलिसांचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्यांनी ट्विट करत लिहिलं होतं, ‘लग्न अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे पण त्यांच्या सेवेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे शेकडो सुरक्षा कर्मचारी, बुलेटप्रुफ लँड क्रूझर तैनात केले आहेत. वाह! यात काहीच आश्चर्य नाही की पंजाबचे गवर्नर विचारत होते की पंजाबचे रुपये कुठे आहेत? गेल्या 18 महिन्यांत घेतलेल्या 50 हजार कोटी रुपयांचा कर्ज खर्च करण्यात आला आहे.’