मुंबई: ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले… अपने पर भरोसा है तो ये दाव लगा ले…’ हे गाणं तुम्हाला आठवतंय का? ‘बाजी’ या चित्रपटातील गाणं आजही ऐकताना तितकंच श्रवणीय वाटतं. देव आनंद यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली हातात गिटार घेऊन गाणं गुनगुनणारी अभिनेत्री, ती आठवते का? आता जे तुमच्या ओठी नाव आलं त्यांच्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सुपरहिट अभिनेत्री गीता बाली… गीता बाली यांचा आज स्मृतिदिन आहे त्यानिमित्त त्यांच्या ‘सुपरहिट करिअर’वर एक नजर टाकुयात…
50 च्या दशकात ज्या अभिनेत्रीने मोठा पडदा गाजवला त्या गीता बाला मूळच्या पाकिस्तानमधल्या सरगोधा शहरातल्या. पण जसंजसं गीता यांच्यातल्या अभिनय कौशल्याला प्लॅटफॉर्म मिळू लागला तसं त्यांचं पूर्ण कुटूंब मुंबईला येऊन स्थायिक झालं.
बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात
गीता यांनी वयाच्या 12 व्या वर्षी बालकलाकार म्हणून ‘मोची’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. तिथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नंतर मग 1946 ला आलेल्या ‘बदनामी’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केलं. तिथून सुरू झाला गीता नावाच्या पर्वाचा प्रवास…
10 वर्षात 70 सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री
कपूर घराण्यात लग्न करून गेल्यानंतर अभिनेत्रींचं करिअर संपुष्टात येतं हा इतिहास आहे. पण गीता याला अपवाद ठरल्या. 1963 ला ‘जब से तुम्हे देखा है’ हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा त्यांच्या करिअरला 10 वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा त्यांच्या नावावर 70 हून अधिक चित्रपट होते.
गीता बाली शम्मी कपूर यांची प्रेम कहानी
‘रंगीन रातें’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान गीता बाली आणि शम्मी कपूर यांची ओळख झाली. या चित्रपटात शम्मी कपूर मुख्य भूमिकेत होते. या दरम्यान दोघांची मैत्री झाली. मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गीता या शम्मी यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. शम्मी यांनी दोनदा लग्नासाठी विचारणा केल्यानंतर गीता लग्नासाठी तयार झाल्या.
लग्नाच्या वेळी लिपस्टिक बनली सिंदूर
गीता आणि शम्मी कपूर यांनी बाणगंगा मंदिरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. यावेळी जॉनी वॉकर आणि निर्माते हरी हे दोघंच लग्नाला उपस्थित होते. लग्नाच्यावेळी त्यांच्याकडे सिंदूर नसल्याने गीता यांनी आपल्या बॅगेतून लिपस्टिक काढली. ती लिपस्टिकच गीता यांच्यासाठी सिंदूर बनली.
दीर आणि सासऱ्यासोबत काम
गीता बाली यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. शम्मी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधी त्यांनी दीर राज कपूर यांच्यासोबत ‘बावरे नैन’ आणि ‘आनंद मठ’मध्ये या चित्रपटात काम केलं होतं. आनंद मठ हा चित्रपट गीता यांच्या करिअरमधल्या महत्वाच्या सिनेमांपैकी एक आहे. तसंच सासरे पृथ्वीराज कपूर यांच्या सोबतही त्यांनी काम केलं आहे.
लग्नानंतर गीता आणि शम्मी यांना आदित्य आणि कांचन अशी दोन मुलं झाली. 21 जानेवारी 1965 ला त्यांचं एका दुर्धर आजाराने निधन झालं. गीता यांच्या जाण्यानंतर 4 वर्षांनी शम्मी कपूर यांनी नीला देवी यांच्यासोबत लग्न केलं.
संबंधित बातम्या