नरगिस फाखरीच्या बहिणीला अटक; एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा आरोप
अभिनेत्री नरगिस फाखरीची बहीण आलिया फाखरीला न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली आहे. एक्स बॉयफ्रेंडसह त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. वर्षभरापूर्वीच आलियाचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं होतं.
‘रॉकस्टार’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरीची बहीण आलिया फाखरीला दोन जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आहे तर दुसरी त्याची मैत्रीण ॲनास्तेशिया स्टार एटीनी आहे. न्यूयॉर्कमधील क्वीन्स याठिकाणी असलेल्या गॅरेजला आग लावून आलियाने दोघांना ठार मारल्याची माहिती समोर येत आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुरात श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाल्याने आणि इतर जखमांमुळे दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आलियाला जामीन नाकारण्यात आला असून तिच्यावर हत्येचा आरोप आहे. आलिया 43 वर्षांची असून तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड 35 आणि त्याची मैत्री ॲनास्तेशिया 33 वर्षांची होती.
2 नोव्हेंबर रोजी आलिया फाखरी पहाटे गॅरेजमध्ये आली आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या जेकब्सला धमकी देत ओरडली, “तुम्ही सर्वजण आज मरणार आहात.” साक्षीदारांनीही तिची धमकी ऐकली आणि नंतर गॅरेजला आग लागल्याचं त्यांना आढळलं, अशी माहिती जिल्हा वकील मेलिंडा काट्स यांनी दिली. घटनेच्या वेळी जेकब्स झोपला होता. ॲनास्तेशियाला जेव्हा आगीविषयी समजलं तेव्हा ती खाली आली आणि आग पाहून जेकब्सला वाचवण्यासाठी पुन्हा वर गेली. यावेळी दोघांचाही श्वास गुदमरून आणि थर्मल जखमांमुळे मृत्यू झाला.
View this post on Instagram
आलिया फाखरीवर फर्स्ट डिग्री हत्येचे चार आणि सेकंड डिग्री हत्येचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर ग्रँड ज्युरीने जाळपोळ केल्याचा आरोपही केला आहे. या आरोपांमध्ये ती दोषी ठरल्यास आलियाला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल, असं वकील म्हणाले. न्यायालयाने तिला कोठडी सुनावली असून याप्रकरणी पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे. आलियाने याआधीही जेकब्सला त्याचं घर जाळून टाकण्याची धमकी दिली होती, अशी माहिती साक्षीदाराने दिली.
या घटनेवर अद्याप नरगिसने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिच्या आईने आलियाचा बचाव केला आहे. “मला वाटत नाही की ती कोणाला मारू शकेल. तिला प्रत्येकाची खूप काळजी होती. ती प्रत्येकाची मदत करायची”, असं त्या म्हणाल्या. तर एडवर्ड जेकब्सच्या आईने सांगितलं की त्याचं आलियासोबत वर्षभरापूर्वीच ब्रेकअप झाला होता. मात्र तो नकार तिला पचवता आला नाही. तर दुसरीकडे जेकब्स आणि एटीनी हे दोघं रोमँटिक रिलेशनशिपमध्ये नव्हते तर फक्त मित्र होते, अशीही माहिती समोर येत आहे.