बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी जोडप्यांच्या अनेक गॉसिप्स दररोज ऐकायला मिळतात. काही सेलिब्रिटींचे किस्से एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावेत असेच असतात. असाच एक किस्सा हाय प्रोफाइल सेलिब्रिटींच्या लग्नात व्हिडीओ शूट करणाऱ्या फिल्ममेकर विशाल पंजाबीने सांगितला आहे. सेलिब्रिटींबद्दलचे अनेक किस्से त्याला माहित असतात. मात्र आता त्याने असा एक किस्सा सांगितला आहे, जो ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशाल पंजाबीने एका सेलिब्रिटी कपलचं गुपित उघड केलं आहे. त्याने सांगितलं की या घटनेमुळे त्याला आजपर्यंत त्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. बॉलिवूडमधल्या एका मोठ्या अभिनेत्याने लग्नाच्या दोन महिन्यांतच पत्नीची फसवणूक केली होती. इतकंच नव्हे तर त्या अभिनेत्याला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडलं होतं.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विशालने सांगितलं, “लग्नाच्या दोन महिन्यांतच एका सेलिब्रिटीने पत्नीची फसवणूक केली होती. तो सेटवर मेकअप व्हॅनमध्ये अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडला गेला होता. त्याच्या पत्नीने त्याला अभिनेत्रीसोबत नग्नावस्थेत पाहिलं होतं. मी त्याला फोन करत होतो, तर तो फोन उचलत नव्हता. जेव्हा पत्नीला फोन केला, तेव्हा ती माझ्यावर ओरडली की, माझ्याशी बोलू नकोस. मला लग्नाचे कोणतेच व्हिडीओ नकोत. नंतर मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला. तेव्हा तोसुद्धा हेच म्हणाला की आम्हाला लग्नाला व्हिडीओ नकोय. तेव्हा मला प्रश्न पडला की मी काय करू?”
लग्नाच्या संपूर्ण शूटिंगनंतरही पैसे न मिळाल्याने अखेर विशालने त्याच्या बिझनेसमधील काही नियम बदलले. “त्यावेळी माझ्याकडे एक बाँड होता. लग्नाआधी 50 टक्के आणि लग्नानंतर 50 टक्के असं मानधन मी स्वीकारत होतो. मात्र या घटनेनंतर मी आधीच 100 टक्के मानधन घेऊ लागलो”, असं त्याने स्पष्ट केलं. त्या लग्नाचं फुटेज अजूनही माझ्याकडे आहे, असं त्याने सांगितलं. ते विकून मी खूप पैसा कमावू शकतो, असंही तो गमतीत म्हणाला.
“लग्नाचा रेकॉर्ड अजूनही माझ्याकडे आहे. नवरा रडतोय आणि म्हणतोय की ‘आय लव्ह यू बेबी’. तुम्हाला समजतंय की ते खोटे अश्रू आहेत. तो एक मोठा बॉलिवूड अभिनेता आहे. मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. पण खरंच मला त्याची कीव येते. माझ्याकडे असलेल्या त्या फुटेजची किंमत लाखोंमध्ये आहे. ती एक कॉमेडी फिल्म आहे. ती विकून मी खूप पैसा कमावू शकतो”, असं विशाल पुढे म्हणाला. विशालने आतापर्यंत अनुष्का शर्मा-विराट कोहली, दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींच्या लग्नाचे व्हिडीओ शूट केले आहेत.