Emergency Movie | कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावरून वादंग, नेहरू-गांधी परिवाराला बदनाम करण्याचा डाव, काँग्रेसचा आरोप
भाजपचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेस या चित्रपटावर आक्षेप घेत आहे. आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीवरील काळा डाग होता हे काँग्रेसला माहीत आहे आणि या चित्रपटातून त्यांचा पक्ष उघड होऊ शकतो.
मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि वाद हे समीकरण अत्यंत जुनेच आहे. कंगनाचा कोणताही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याशिवाय पुर्ण होतच नाही. आता कंगनाचा आगामी चित्रपट इमर्जन्सी (Emergency) देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत मध्य प्रदेश काँग्रेसने आरोप केला आहे की, चित्रपटाच्या माध्यमातून नेहरू-गांधी परिवाराला बदनाम करण्याचा डाव आहे. या चित्रपटाच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये (Teaser) कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
कंगनाच्या चित्रपटावर मध्य प्रदेश काँग्रेसने आक्षेप घेतला
कंगनाच्या या चित्रपटावर मध्य प्रदेश काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भोपाळमधील काँग्रेस आमदार पीसी शर्मा यांनी आरोप केला की, कंगना राणौत भाजपची अघोषित प्रवक्ता म्हणून वक्तव्ये करत असते. आता ज्याप्रकारे तिला या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली आहे तर मला वाटते की या चित्रपटातून नेहरू-गांधी कुटुंबाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोयं.
पीसी शर्मा यांनी कंगनावर केला मोठा आरोप
शर्मा म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचे दृश्य नीट पाहिले पाहिजे. चित्रपटातून नेहरू-गांधी घराण्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला जाणार असला तरी नेहरू-गांधी घराण्याचा त्याग आणि देशासाठी त्यांनी दिलेले योगदान जनतेला चांगलेच माहिती आहे.
भाजपचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया यांचे मोठे विधान
भाजपचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेस या चित्रपटावर आक्षेप घेत आहे. आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीवरील काळा डाग होता हे काँग्रेसला माहीत आहे आणि या चित्रपटातून त्यांचा पक्ष उघड होऊ शकतो, म्हणूच त्यांच्याकडून या चित्रपटाला विरोध केला जातोयं.
कंगना राणौतने इमर्जन्सी चित्रपटाची निर्मिती केली
कंगना रनौतने इमर्जन्सी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनानेच केले आहे. यापूर्वी कंगना रनौत ‘थलायवी’ चित्रपटात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. नेहमी प्रमाणेच कंगनाच्या या चित्रपटावरून मोठा वाद उभा राहिला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर वाद पेटला असून पुढे या चित्रपटाचे काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.