‘सैराट’ या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट आजपासून (4 मार्च) सिनेमागृहांमध्ये दाखल झाला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानसाठी (Aamir Khan) या चित्रपटाच्या खासगी स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. ‘झुंड’ हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असल्याचं मत आमिरने यावेळी मांडलं. हा चित्रपट पाहताना आमिरचे डोळे पाणावले. चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर त्यातील कलाकारांनी आमिरची भेट घेतली. ‘सैराट’मध्ये परश्याची भूमिका साकारलेला आकाश ठोसर याचीसुद्धा ‘झुंड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावेळी आकाशनेही आमिरची गळाभेट घेतली.
आकाशच्या भूमिकेबद्दल काय म्हणाला आमिर?
आमिर खान आकाशच्या अभिनयाने फारच प्रभावित झाला. मात्र त्याला आकाशला मोठ्या पडद्यावर नकारात्मक भूमिकेत पहायचं नव्हतं. “नागराजने तुला ही भूमिका का दिली? तू खूपच छान अभिनय केलास. मला तुझं काम खूप आवडतं. पण मला तुला मोठ्या पडद्यावर वाईट मुलाच्या भूमिकेत पहायचं नव्हतं”, असं आमिर त्याला म्हणतो. आकाशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
‘झुंड’च्या प्रवासातील हा सर्वोत्कृष्ट क्षण आहे. माझ्या कामाचं कौतुक केल्याबद्दल आमिर खान सरांचे आभार, असं कॅप्शन आकाशने या व्हिडीओला दिलं आहे. ‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली. नागपूरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं.
संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!