Aamir Khan: ‘महाभारत’च्या प्रोजेक्टविषयी आमिरने व्यक्त केली भीती; म्हणाला “मी त्या यज्ञासाठी तयार नाही”
एकीकडे त्याच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असतानाच आमिरच्या महाभारत या दुसऱ्या प्रोजेक्टविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. महाभारत (Mahabharat) हा आमिरचा 'ड्रीम प्रोजेक्ट' (Dream Project) आहे असं म्हटलं जातं.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि अनेकदा प्रदर्शनाची तारीख लांबणीवर ढकलल्यानंतर अखेर अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे त्याच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असतानाच आमिरच्या महाभारत या दुसऱ्या प्रोजेक्टविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. महाभारत (Mahabharat) हा आमिरचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ (Dream Project) आहे असं म्हटलं जातं. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. जवळपास 1000 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाची चर्चा काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. “जेव्हा तुम्ही महाभारत बनवता, तेव्हा तो फक्त एक चित्रपट नसतो तर तो एक प्रकारचा यज्ञ असतो. चित्रपटापेक्षाही फार काही त्यात असतं. त्यामुळे मी सध्या त्यासाठी तयार नाही. हा प्रोजेक्ट मी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी घाबरत आहे. महाभारत तुम्हाला कधीही निराश करणार नाही, तुम्ही कदाचित त्याला निराश करू शकता”, असं आमिर या मुलाखतीत म्हणाला.
‘लाल सिंग चड्ढा’ला बॉयकॉट करण्याच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया
प्रदर्शनापूर्वी आमिरच्या या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली. तर काहींनी चित्रपटात मोना सिंगने आमिरच्या आईची भूमिका साकारल्याबद्दल तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावरील या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल आमिर पुढे म्हणाला, “मला वाईट वाटतं. मला वाईट याचं वाटते की जे काही लोक हे बोलत आहेत, त्यांच्या मनात अशी भावना आहे की मला भारत आवडत नाही. त्यांच्या तसा विश्वास आहे. परंतु ते सत्य नाही. काही लोकांना असं वाटतं हे दुर्दैवी आहे. तसं अजिबात नाही. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पहा.”
लाल सिंग चड्ढा हा फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.