सुहानीने अचानक जग सोडले…आमिर खान याची काळजाला हात घालणारी पोस्ट व्हायरल
आमिर खानच्या दंगल या सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या सुहानी भटनागर हिचा मृत्यू झाला आहे. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे भटनागर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुहानीच्या निधनाने बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने सुहानीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. ट्विटरवरून आमिरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : आमिर खानच्या दंगल या सिनेमातून सुहानी भटनागरने आपल्या अभिनयाची छाप सोडली. बालकलाकार म्हणून ती या सिनेमात फिट्ट बसली होती. अत्यंत कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सुहानीचा अचानक मृत्यू झालाय. फरिदाबादच्या एका रुग्णालयात तिने जगाचा निरोप घेतला. 19 हे वय तिचं जाण्याचं नव्हतं. तिच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी सुहानीच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता आमिर खाननेही सुहानीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आमिरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
आमिर खान प्रोडक्शनने ट्विट करून सुहानीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सुहानीच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्ही हबकून गेलो आहोत. आम्हाला धक्का बसला आहे. सुहानीची आई पूजा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करत आहोत, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तिच्या शिवाय ‘दंगल’ अर्धवट
सुहानी शिवाय दंगल अर्धवट आहे. ती अत्यंत हुशार मुलगी होती. चांगली टिम प्लेअर होती. तिच्या शिवाय दंगल अर्धवटच आहे. सुहानी तू नेहमी आमच्या हृदयात असशील. तुझ्या आत्म्याला शांती मिळो, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कसा झाला मृत्यू?
सुहानी भटनागर अवघ्या 19 वर्षाची होती. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला होता. त्यात तिचे पाय फ्रॅक्चर झाले होते. फ्रॅक्चर झाल्यावर तिने काही औषधे घेतली. त्यामुळे रिअॅक्शन झालं. औषधांचा चुकीचा परिणाम झाल्याने तिच्या शरीरात पाणी झालं. तिच्यावर फरिदाबादच्या एका रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण ती वाचू शकली नाही.
दंगलनंतर ती प्रसिद्धीपासून दूर राहिली होती. इन्स्टावर तिचं अकाऊंट आहे. तिने नोव्हेंबर 2021मध्ये इन्स्टावर शेवटची पोस्ट टाकली होती. तिचे इन्स्टावर 23 हजार फॉलोअर्स आहेत. या फॉलोअर्समध्ये तिच्यासोबत दंगलमध्ये काम करणारी सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेखही आहेत.
अभिनयाचं कौतुक
सुहानीने आमिर खानच्या दंगल सिनेमात काम केलं होतं. छोटी बबीता म्हणून तिने व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमात साक्षी तंवर आणि जायरा वसीमसोबत फातिमा सना शेख सुहानीसोबत दिसले होते. सुहानीच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर तिने अनेक व्यावसायिक जाहिराती केल्या. त्यानंतर शिक्षणासाठी अभिनय सोडला. आता तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तिला परत सिनेमात यायचं होतं. त्यासाठी प्लानिंग सुरू होतं. पण अचानक तिच्यावर काळाने घाला घातला.