Saif Ali Khan : घरात घुसलेल्या चोरट्याने 1 कोटी मागितले, मग मोलकरणीशी हुज्जत, आरडाओरड आणि…, सैफच्या घरात मध्यरात्री थरार
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने 1 कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. या 1 कोटीच्या मागणीवरून आरोपी आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणमध्ये वाद झाला होता, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात चोरीच्या निमित्ताने शिरलेल्या चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. वरवर पाहता ही घटना सुरुवातीला आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि त्यानंतर सैफ आणि आरोपीमध्ये झटापटी झाली, या झटापटीत सैफ हा गंभीर जखमी झाल्याचा अंदाज बांधला जात होता. पण ही घटना वाटते तितकी सोपी नाही हे आता स्पष्ट होत आहे. कारण या प्रकरणाबाबत अतिशय धक्कादायक माहिती आता समोर येताना दिसत आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने 1 कोटी रुपये मागितले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. या 1 कोटीच्या मागणीवरून आरोपी आणि सैफच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणमध्ये वाद झाला होता. सैफने यामध्ये हस्तक्षेप करताच आरोपीने त्याच्यावर वार केल्याचं समोर आलं आहे. सैफचा मुलगा जहांगीरची देखभाल करणाऱ्या नर्स एलियामाच्या जबाबात आरोपीने 1 कोटी मागितल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्ल्यात सैफ अली खान आणि दोन मोलकरीण जखमी झाल्याचादेखील उल्लेख आहे. दरम्यान, सैफ अली खान यांच्या घरातील काम करणारी मोलकरीण लिमा हिची देखील पोलिसांकडून चौकशी झाली आहे आणि या चौकशीनंतर ती पुन्हा सैफ अली खान यांच्या घरी परतली आहे.
पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास
सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी 10 पथकं तयार केली आहेत. आरोपी घरात कसा शिरला? हल्ला करून कसा बाहेर पडला? या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. सुरक्षेसाठी असलेल्या शिडीवरून आरोपी घरात घुसला आणि त्याच शिडीवरून पळून गेला असा पोलिसांचा अंदाज आहे. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले. वार झाल्यानंतर सैफ अली खानला जखमी अवस्थेत रिक्षातून लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणी CIU (क्राईम इंटेलिजन्स युनिट ) ही तपास करत आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास), घरफोडी तसेच रात्रीच्या वेळी घोरपडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने हल्लेखोर घरात घुसल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपीची ओळख पटली, पहिला फोटो समोर
पोलिस सूत्रांच्या माहितीप्रमाणे, ज्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत. पोलिसांचा असा विश्वास आहे की, अशाप्रकारे फक्त सराईत आरोपीच करू शकतात. हल्ल्याच्या वेळी डम डेटाच्या आधारे आरोपीची ओळख पटली, पोलिसांना त्या भागात कोणते मोबाईल नेटवर्क सक्रिय होते याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सैफच्या इमारतीमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीत आरोपी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पायऱ्या उतरताना दिसत आहे. त्याचा चेहरा सीसीटीव्हीत अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. पाहा आरोपीचा फोटो:
सैफला उद्याच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
सैफ अली खानला उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सैफवर आज सकाळी 11.30 वाजता शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या निगरणीखाली त्याला ठेवण्यात आलं आहे. सैफला ICU मधून बाहेर काढल्यानंतर मुंबई पोलीस त्याचं स्टेटमेंट नोंदवून घेणार आहेत.