Aditya Singh Rajput Death : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्याचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हर डोसमुळे की आणखी काही?; मृत्यूपूर्वी मित्रांसोबत पार्टी?
अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूत याचं अकाली निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही जगतावर शोककळा पसरली आहे.
मुंबई : ‘गंदी बात’ आणि ‘स्प्लिट्सविला’ फेम अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूत याचा अत्यंत अल्प वयात मृत्यू झाला आहे. त्याच्या अंधेरी येथील फ्लॅटमधील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह ज्या पद्धतीने आढळून आला त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आदित्य सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू ओव्हर डोसमुळे झाला की यामागे आणखी काही कारण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आदित्यचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण पुढे येणार आहे.
आदित्य सिंह राजपूत अंधेरीतील एका सोसायटीतील 11 व्या मजल्यावर राहत होता. या रुममधील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह पडलेला आढळून आला. सर्वात आधी त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने लगेच वॉचमनला बोलावून घेतलं. वॉचमनच्या मदतीने आदित्यचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. काही मीडिया वृत्तानुसार ड्रग्सचे ओव्हर डोस घेतल्याने आदित्यचा मृत्यू झाला असावा. मात्र, पोलीस आणि आदित्यच्या कुटुंबीयांना याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. मात्र, आदित्यचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मृत्यूपूर्वी पार्टी
मृत्यूच्या काही वेळापूर्वी आदित्यने मित्रांसोबत पार्टी केल्याचं सांगितलं जातं. या पार्टीचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअरही केले होते. दरम्यान, अवघ्या 32 व्या वर्षी आदित्यने जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनाही जबर धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून त्याला श्रद्धांजलीही वाहिली जात आहे.
मॉडेल म्हणून सुरुवात
आदित्य हा मूळचा दिल्लीचा राहणारा आहे. त्याने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने क्रांतीवीर आणि मैने गांधी को नहीं मारा सारख्या सिनेमातही काम केलं होतं. मात्र, त्याला या सिनेमांमधून म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याने अनेक जाहिरातीतही काम केलं होतं. त्याने ऋतिक रोशन आणि सौरव गांगुली सारख्या सेलिब्रिटिंसोबतही काम केलं होतं.
स्प्लिट्सविलामुळे ओळख मिळाली
वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षापासून आदित्यने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याला स्प्लिट्सविला या रिअलिटी शोमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती. या शिवाय लव्ह आशिकी, कोड रेड, बॅड बॉईज सीजन-4 सारख्या शो आणि गंदी बात सारख्या वेब सीरिजमुळे त्याला नाव मिळाले होते. काही काळापूर्वी त्याने पॉप कल्चर फॅशन नावाचा ब्रँड सुरू केला होता.