KRK: कोठडीत असलेल्या केआरकेला दिलासा नाहीच!
52 वर्षीय केआरकेचं पूर्ण नाव मोहम्मद राशिद मोहम्मद इकबाल कमाल असं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुबईत होता. सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.
सोमवारी रात्री उशिरा अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला (Kamaal R Khan) अटक झाली होती. केआरकेला हा आठवडा आता कारागृहातच घालवावा लागणार आहे. कारण त्याच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. वादग्रस्त ट्विट (Derogatory tweet) प्रकरणातील ही सुनावणी आता सोमवारी 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटासंबंधी 2020 मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला मुंबईच्या मालाड पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. “आज त्याच्या जामिनावर सुनावणी होणार होती. परंतु शुक्रवारी कोर्टाची सुट्टी असल्याने आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे”, अशी माहिती केआरकेचे वकील अशोक सराओगी यांनी दिली. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याविरोधातील वादग्रस्त ट्विटप्रकरणीही केआरकेविरोधात वांद्रे पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातही त्याची कस्टडी मागितली जाऊ शकते.
52 वर्षीय केआरकेचं पूर्ण नाव मोहम्मद राशिद मोहम्मद इकबाल कमाल असं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुबईत होता. सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली. या अटकेनंतर त्याला मंगळवारी बोरिवलीतील कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
24 ऑक्टोबर 2020 रोजी मालाड पोलीस ठाण्यात केआरकेविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर त्याच महिन्यात लूकआउट परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या युवा शाखेचे राहुल कनाल यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
आपल्या ट्विट्समुळे वादात सापडण्याची केआरकेची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बॉलिवूड कलाकारांविरोधात, क्रिकेटर्सविरोधात आणि इतर मोठ्या सेलिब्रिटींविरोधात वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. केआरके त्याच्या ट्विट्समध्ये शाहरुख आणि सलमानलाही बरं-वाईट बोलला आहे. केआरकेनं सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाचं अत्यंत नकारात्मक समिक्षण केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यात त्याने सलमानवरही अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर सलमानने केआरकेविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. कमाल खानने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्या काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे.