नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : खतरों के खिलाडी आणि बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम हिला मारहाण झाली आहे. काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेस कार्यालयातच प्रवेश नाकारण्यात आला. उलट काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या काही महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांना शिवीगाळ केली आणि कार्यालयाबाहेरून हुसकावून लावले. स्वत: अर्चनाने हा आरोप केला आहे. या घटनेमुळे अर्चना गौतम चांगल्याच बिथरून गेल्या आहेत. तसेच अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अर्चना गौतमी ही तिच्या वडिलांसोबत काल काँग्रेस कार्यालयात पोहोचली होती. यावेळी तिने वडिलांसह पक्षाच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. पण तिला जाऊ दिले नाही. तिथे उपस्थित असलेल्या महिलांना तिला मारहाण केली. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी ती आली होती. पण दोघांनाही पक्षाच्या कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
काही महिलांनी अर्चनाचे केस ओढले. कुणी धक्काबुक्की केली. तर कुणी तिला शिवीगाळ करून कार्यालयाबाहेरून पिटाळून लावले. यावेळी कार्यालयाबाहेर एकच गोंधळ झाला. अर्चनाच्या सहकाऱ्यांनी तिला तात्काळ सावरले आणि गाडीत बसवून निघून गेले. मात्र, झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अर्चना प्रचंड संतापली आहे. मी शांत बसणार नाही. मी पुढची लढाई लढणारच. माझ्यासोबत जे झालं. ते अत्यंत धक्कादायक आणि चुकीचं होतं, असं अर्चनाने म्हटलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अर्चना गौतम आणि तिचे वडील आज मेरठमध्ये याबाबतची पोलीस तक्रार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अर्चना आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराची माहिती देत तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अर्चनाकडून पोलीस तक्रार आणि पत्रकार परिषदेबाबतची माहिती आलेली नाही. त्यामुळे आज अर्चना कालच्या प्रकारावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वीही अर्चनाने मार्चमध्ये प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंग यांच्या विरोधात मेरठच्या परतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. संदीप सिंग याने अर्चनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्चनाच्या वडिलांनी केला होता. तसेच अर्चनाचं अपहरण करून तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही देण्यात आली होती. शिवाय तिला अपमानास्पद वागणूकही देण्यात आली होती.