मी टू मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींकडून गंभीर आरोप झाल्यानंतर दिग्दर्शक साजिद खानने (Sajid Khan) नुकतीच बिग बॉस 16 (Bigg Boss 16) या रिॲलिटी शोमध्ये एण्ट्री केली. बिग बॉसमध्ये साजिदला पाहताच अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. मी टूचे (Me Too) आरोप असतानाही त्याला संधी का दिली, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. त्यानंतर आता एका अभिनेत्रीने थेट बॉलिवूडमध्ये पुन्हा कधीच काम करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या इंडस्ट्रीत महिलांसाठी काहीच आदर नाही, असं ती म्हणाली.
बिग बॉसच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये साजिद खानची एण्ट्री पाहताच अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर कलर्स वाहिनी आणि बिग बॉसच्या निर्मात्यांकडून अनेक पोस्ट लिहिले गेले. जवळपास चार वर्षांपूर्वी अनेक महिलांनी पुढे येत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यापैकी एक होती अभिनेत्री मंदाना करिमी.
हमशकल्स या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असता साजिदने कपडे काढण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप मंदानाने केला होता. “मी जे पाहीन ते जर मला आवडलं, तर तुला चित्रपटात भूमिका मिळेल”, असं साजिद तिला म्हणाल्याचं मंदानाने सांगितलं होतं. अशा व्यक्तीला पुन्हा लाइमलाइटमध्ये पाहून मोठा धक्का बसल्याचं मंदाना म्हणाली.
“प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, त्याला पुन्हा स्पॉटलाइटमध्ये पाहून मला आश्चर्य वाटलं नाही. एखाद्या गोष्टीतून मला फायदा होत असेल, त्यातून पैसे मिळत असतील तर मी कशाला कोणाची पर्वा करू, असं लोकांना वाटतं. यामुळेच भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये मी टू मोहिमेनंतर पुढे काहीच होऊ शकलं नाही”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.
“साजिदला पुन्हा शोमध्ये पाहून मला खूप वाईट वाटलं. याच कारणामुळे मी गेल्या सात महिन्यांपासून काम करत नाहीये. मी पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नाही. कोणत्याच ऑडिशनसाठी जाणार नाही. मला बॉलिवूडमध्ये परत जायचं नाहीये. जिथे महिलांना आदर नाही, अशा ठिकाणी मला काम करायचं नाही”, असं ती पुढे म्हणाली.