Afghanistan Taliban Crisis : जेव्हा हेमा मालिनी ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणासाठी अफगाणिस्तानला पोहचल्या होत्या, कशी होती तेव्हाची परिस्थिती? जाणून घ्या…
हेमा मालिनी यांनी 70च्या दशकातील एक आठवण शेअर केली, जेव्हा त्या त्यांच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. हेमा मालिनी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत किती फरक पडला आहे.
मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने देशाची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यापासून जगभरात खळबळ उडाली आहे. सोमवारी, अनेक अफगाणी आणि परदेशी नागरिक काबूल विमानतळावर देश सोडण्याचा प्रयत्न करताना दिसले. गृहयुद्धाच्या वातावरणात, अफगाणिस्तानची परिस्थिती अशी आहे की, तिथल्या प्रत्येकाला तालिबानच्या भीतीने तिथून बाहेर पडायचे आहे. अफगाणिस्तानातील या परिस्थिती पाहून बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी देखील दुःखी झाल्या आहेत.
यावेळी हेमा मालिनी यांनी 70च्या दशकातील एक आठवण शेअर केली, जेव्हा त्या त्यांच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. हेमा मालिनी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत किती फरक पडला आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे काही पोस्टर शेअर केले आहेत. हे शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले- “एकेकाळी शांतता असलेल्या अफगाणिस्तान या देशामध्ये आज जे घडत आहे ते खरोखरच दुःखद आहे.”
हेमा मालिनी यांनी शेअर केल्या अफगाणिस्तानशी संबंधित आठवणी
अभिनेत्रीने पुढे लिहिले- “माझ्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाशी संबंधित अफगाणिस्तानातील अनेक अद्भुत आठवणी आजही ताज्या आहेत. मी एका जिप्सी मुलीची भूमिका करत होते आणि माझा संपूर्ण सिक्वेन्स तिथे चित्रीत झाला होता. यावेळी माझे आई-वडीलही माझ्याबरोबर होते आणि फिरोज खानने आमची खूप छान काळजी घेतली.”
What is happening to a happy, once peaceful nation, Afghanistan, is truly sad. My great memories of Afghanistan date back to ‘Dharmatma’- I play a gypsy girl & my portion was shot entirely there. Had a great time as my parents were with me and Feroz Khan took good care of us pic.twitter.com/2jrsZJpvQd
— Hema Malini (@dreamgirlhema) August 17, 2021
अफगाणिस्तानमध्ये चित्रीत झालेला पहिला बॉलिवूड चित्रपट!
अहवालांनुसार, हेमा मालिनीचा चित्रपट धर्मात्मा हा अफगाणिस्तानमध्ये चित्रीत झालेला पहिला बॉलिवूड चित्रपट होता. हेमा मालिनी आणि फिरोज खान व्यतिरिक्त, रेखा, डॅनी डेन्झोन्गपा आणि हेलन सारखे अनेक स्टार्स या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते. एका अहवालानुसार, हेमा मालिनी यांनी अफगाणिस्तानला एक अतिशय सुंदर देश म्हणून संबोधले होते. त्यांनी सांगितले होते की, या शूटिंग दरम्यान त्यांनी बामियान, खैबर पास आणि बँड-ए-अमीरलाही भेट दिली होती.
हेमा मालिनी म्हणाल्या, “मला माहीत असलेला काबूल खूप सुंदर होता आणि मला तिथे खूप छान अनुभव आला. आम्ही काबूल विमानतळावर उतरलो होतो, जे त्यावेळी मुंबई विमानतळाएवढे लहान होते. त्यानंतर आम्ही जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबलो, पण आमच्या या शूटिंगदरम्यान आम्ही बामियान आणि बंद-ए-अमीर सारख्या ठिकाणी प्रवास केला आणि परतीच्या वाटेवर आम्ही तालिबानीसारखे दिसणारे हे लांब कुर्ते आणि दाढी असलेले पुरुष पाहिले. त्या वेळी अफगाणिस्तानात रशियन सत्ता देखील होती.”
हेही वाचा :
पंजाबी क्वीन इहाना ढिल्लोंचा वाढदिवस, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे