चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार थलाइवा रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे. सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिणे, 30 ग्रॅमचे हिऱ्यांचे दागिने आणि चार किलोच्या चांदीचे दागिने चोरण्यात आले आहे. या प्रकरणी ऐश्वर्या यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, थेट रजनीकांत यांच्या कन्येच्या घरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीणचे नाव ईश्वरी आहे. तर ड्रायव्हरचे नाव वेंकटेशन आहे. गेल्या 18 वर्षापासून ईश्वरी ऐश्वर्या यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते. तिला ऐश्वर्याच्या घरातील प्रत्येक कोपऱ्या न् कोपऱ्याची माहिती होती. तिने यापूर्वीही ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
लॉकरची चावी कुठे ठेवली जाते हे ईश्वरीला माहीत होते. ती लॉकर उघडण्यासाठी या चावीचा नेहमी वापर करत असे. तिने काही वेळा पुरते दागिने आणि अन्य वस्तू चोरल्या. हे दागिने विकून तिने घर घेतले होते. तिच्याकडून घर खरेदी करण्यात आल्याची कागदपत्रेही जप्त करण्यात आले आहेत. ही चोरी झाल्यानंतर ऐश्वर्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या तक्रारीत ऐश्वर्याने सविस्तर माहिती दिली होती. 2019मध्ये मी शेवटी बहीण सौंदर्याच्या लग्नात हे दागिने परिधान केले होते. चोरी झालेल्या दागिण्यांमध्ये डायमंड सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या आदींचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात दागिने घातल्यानंतर हे दागिने पुन्हा लॉकरमध्ये ठेवले. पण 10 फेब्रुवारी रोजी पाहिले तर दागिने गायब होते, असं ऐश्वर्याने म्हटलं आहे. या संपूर्ण दागिण्यांची किंमत 3.60 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.
ऐश्वर्या रजनीकांत सध्या लाल सलाम सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिला तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये शुटिंगला जावे लागत आहे. तिने 2021मध्ये लॉकर तीन ठिकाणी शिफ्ट केले होते. दागिने ज्या ज्या ठिकाणी नेण्यात आले, त्यात तिचा आधीचा नवरा धनुष्यचाही फ्लॅट आहे. सीआयटी नगरमध्ये हा फ्लॅट आहे. त्यानंतर चेन्नईच्या सेंट मेरी रोड येथील अपार्टमेंटमध्येही तिने लॉकर नेला होता. नंतर पोएस गार्डन येथील घरी हा लॉकर नेला. त्याच्या चाव्या सेंटमेरी रोडवरील घरातच होत्या.