Akshay Kumar: “मला कोणत्याही घृणास्पद चित्रपटाचा भाग बनायचं नाहीये,” अक्षय कुमारने केलं स्पष्ट
अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय राजूच्या भूमिकेत आहे, जो एका मिठाईच्या दुकानाचा मालक असतो.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्य़ा त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अक्षयने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सांगितलं, “मला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, परंतु ते चित्रपट कौटुंबिक (Family Movies) असावेत. जो प्रत्येकजण बिनदिक्कतपणे पाहू शकेल.” यासोबतच त्याने इतर अनेक मुद्द्यांवरही चर्चा केली. अक्षयचा रक्षाबंधन हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय राजूच्या भूमिकेत आहे, जो एका मिठाईच्या दुकानाचा मालक आहे. आपल्या चार बहिणींचं लग्न पार पाडण्यासाठीचा त्याचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार पुढे म्हणाला, “मला वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. मला एका प्रकारच्या भूमिकेला चिकटून राहायचं नाहीये. पण एक गोष्ट कायम असेल की मी जे चित्रपट करेन ते कौटुंबिक आणि मनोरंजनाचे असावेत. मला कोणत्याही ‘घृणास्पद’ चित्रपटाचा भाग बनायचं नाहीये. सायको-थ्रिलर असो किंवा सामाजिक, तो चित्रपट संपूर्ण कुटुंब कोणत्याही संकोचशिवाय पाहू शकतील असा असावा. चित्रपटाचा संदेश आणि प्रत्येक पैलू कौटुंबिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल याची मी खात्री करतो.”
View this post on Instagram
रक्षाबंधन एक भावनिक कथा
अक्षयचा आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’ हा कौटुंबिक चित्रपट आहे. यापूर्वी त्याचे ‘अतरंगी रे’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आपल्या या चित्रपटाविषयी अक्षय म्हणाला की, “रक्षाबंधन हा समाज आणि आपल्या कुटुंबांसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे, जो भाऊ-बहिणीच्या नात्यावर भाष्य करतो.”