बॉलिवूडचे महानायक (Bollywood Actor) अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Tweet) हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते दररोज ट्विट करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचा आकडाही मोठा आहे. रविवारी रात्री बिग बींनी एक ट्विट केलं. मात्र त्यांच्या या ट्विटमुळे चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘हृदय धडधडतंय.. काळजी वाटतेय.. आणि आशा’ असं ट्विट बिग बींनी केलं. त्यांचं हे ट्विट वाचून चाहते पेचात पडले. त्यांना प्रकृतीविषयी कोणती समस्या जाणवतेय का, असा प्रश्न अनेकांना पडला. अवघ्या काही मिनिटांतच ट्विटरकरांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली. ‘लवकरात लवकर बरे व्हा’, अशी प्रार्थनाही अनेकांनी केली आहे. (Big B Health)
काही वेळानंतर बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं की, त्यांच्या शूटिंगमुळे ते चिंताग्रस्त आहेत आणि नीट अभियन करू शकेन की नाही अशी भीती त्यांना सतावत होती. ‘संवाद पाठ करणं आणि पडद्यावर योग्यरित्या परफॉर्म करणं याची चिंता सतावत होती’, असं त्यांनी त्यात म्हटलं. मढ आयलँड याठिकाणी त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
T 4205 – heart pumping .. concerned .. and the hope ..?❤️
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2022
काही दिवसांपूर्वीच बिग बींचा ‘चेहरे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता ते लवकरच ‘झुंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात ते क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दीपिका पदुकोणसोबतचा ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेकसुद्धा त्यांनी साईन केला आहे.