मुंबई : वेगळ्या धाटणीच्या आणि दर्जेदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता मनोज वाजपेयी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. मनोज वाजपेयीची ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 8 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून हा संपूर्ण चित्रपट आसाराम बापू आणि 16 वर्षाच्या बलात्कार पीडित मुलीला न्याय देणाऱ्या वकिलावर आधारित असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड चर्चा सुरू आहे.
या सिनेमात मनोज वाजपेयी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज वाजपेयी कोर्टात केस लढताना दिसत आहेत. जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे या व्यक्तिरेखेतही मनोज वाजपेयी घुसल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येतं. या सिनेमाचा ट्रेलर प्रचंड ताकदीचा झाला आहे. मात्र, या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आसाराम बापू ट्रस्टने सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावल्याचं वृत्त आहे.
हा सिनेमा आक्षेपार्ह आहे. त्यामुळे आसाराम बापूच्या सन्मानाला ठेच पोहोचू शकते. त्यांची बदनामी होऊ शकते. तसेच त्याच्या भाविकांच्या भावानांना ठेच पोहोचू शकते, असं आसारामच्या वकिलाचं म्हणणं असल्यातचं वृत्त आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसह त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आसारामच्या वकिलाने केली आहे.
अपूर्व सिंह कार्की या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर आसिफ शेख हे निर्माते आहेत. मनोज वाजपेयी या सिनेमात वकील पीस सोळंकी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेत मनोज वाजपेयीने संपूर्ण जीव ओतल्याचं ट्रेलर पाहून कळतं. आसाराम ट्रस्टने लीगल नोटीस दिल्यानंतर आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जातं हे पाहावं लागमार आहे.
दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर पाहून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखा दमदार झाली आहे. सर्वांनीच अफलातून काम केलं आहे. येत्या 23 मे रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ओटीटी शिवाय हा सिनेमा काही थिएटर्समध्येही रिलीज होणार आहे.