अभिनेत्री आयशा टाकियाचा (Ayesha Takia) पती फरहान आझमी (Farhan Azmi) याने गोवा विमानतळावर (Goa airport) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. सुरक्षा डेस्कवरील एका सशस्त्र पुरुष अधिकाऱ्याने पत्नीला शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळ्या रांगेत उभं राहण्यास सांगितलं, असं आझमीने सांगितलं. विमानतळावर तपासणी करताना इतर अधिकाऱ्यांनीही असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप त्याने केला. फरहानने 4 एप्रिल रोजी एका ट्विटर थ्रेडमध्ये याबद्दल लिहिलं. या ट्विटवर दुसऱ्या दिवशी गोवा विमानतळाकडून उत्तर देण्यात आलं.
घडलेल्या घटनेबद्दल सांगताना फरहानने लिहिलं, ‘मी मुंबईला IndiGo6E 6386, 18:40 वाजताच्या फ्लाइटने येत होतो आणि हे वर्णद्वेषी अधिकारी आर पी सिंग, ए के यादव, कमांडर राउत आणि वरिष्ठ अधिकारी (एसपी श्रेणी) बहादूर यांनी माझं नाव त्यांच्या टीमसमोर मोठ्याने वाचल्यानंतर जाणूनबुजून मला माझ्या पत्नी आणि मुलापासून वेगळ्या रांगेत उभं केलं. सेक्युरिटी डेस्कवरील जेव्हा एका पुरुष अधिकाऱ्याने माझ्या पत्नीला स्पर्श केला तेव्हा वादाला सुरुवात झाली. इतर सर्व कुटुंबीय मात्र तपासणीसाठी एकाच रांगेत उभे होते. फक्त माझ्या पत्नीला आणि मुलाला वेगळ्या रांगेत उभं केलं गेलं.’
‘हे सर्व इथंच थांबलं नाही. वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी गार्डला हाताने इशारा केला जो माझी तपासणी करत होता. त्या वर्णद्वेषी गार्डने माझे खिसे तपासताना (ज्यात फक्त 500 ची नोट होती) असभ्य टिप्पणी केली. गोवा विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करतो. त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. या प्रकरणाची दखल घ्या आणि अशा वर्णद्वेषी, असभ्य अधिकाऱ्यांची विशेषत: गोव्यासारख्या पर्यटन विमानतळावर पोस्टिंग करू नका. काही मिनिटांतच त्यांनी बहादूर नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह इतर 5 अधिकाऱ्यांना बोलावलं, ज्यांनी वाद सोडवण्याऐवजी माझ्या बोर्डिंग पासवरून मला ओळखलं आणि ‘इसको उधर करो, ये महाराष्ट्र नहीं है’ (याला तिकडे पाठवा, हे महाराष्ट्र नाही) असं म्हणत धक्काबुक्की केली. इतकंच नव्हे तर टीमसमोर माझं नाव मोठ्याने वाचत मला प्रवेश देण्यास नकार दिला,” असं फरहानने पुढे लिहिलं.
Dear @CISFHQrs
I was boarding for Mumbai on @IndiGo6E 6386, 18:40 hrs flight & these racist officers R P Singh, A K Yadav, commander Rout & senior officer (SP category) Bahadur purposely singled me & my family (wife & son) immediately after they read out my name out loud to team pic.twitter.com/gjHdnFajDN— Farhan Azmi (@abufarhanazmi) April 4, 2022
याप्रकरणी तक्रार दाखल करणार असून गरज पडल्यास कोर्टातही जाणार असल्याचा इशारा फरहानने या ट्विटमधून दिला. फरहानच्या या ट्विट्सना उत्तर देताना गोवा विमानतळाने ट्विट केलं, “प्रवास करताना तुम्हाला आणि कुटुंबीयांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची योग्य दखल घेतली जाईल.” फरहानने त्यांचे आभार मानत पुढे लिहिलं, ‘तुम्ही दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद. माझ्या पत्नीला मुलासह बाजूला करणं हे अत्यंत लाजिरवाणं आणि त्रासदायक होतं. मी कायदेशीररित्यादेखील पाऊल उचलणार आहे.’
महासंचालक शील वर्धन सिंह यांच्याकडे तक्रार पाठवत असल्याचंही फरहानने सांगितलं. ‘आशा आहे की सात दिवसांच्या आत ते कारवाई करतील. असं न झाल्यास मी कायदेशीररित्या पाऊलं उचलेन. मी सीसीटीव्ही फुटेजची कॉपीसुद्धा मागितली आहे’, असं लिहित त्याने पाठिंबा देणाऱ्या नेटकऱ्यांचे आभार मानले. मात्र, डीआयजी अनिल पांडे यांनी फरहानने केलेले आरोप फेटाळून लावले असून सीआयएसएफ हे अत्यंत ‘प्रोफेशनल फोर्स’ असल्याचं म्हटलं आहे. याविषयी ‘द प्रिंट’शी बोलताना ते म्हणाले, “आम्ही (सीआयएसएफ) विमानतळावर दररोज सात लाखांहून अधिक प्रवाशांची तपासणी करतो. अशा किती तक्रारी किंवा आरोप केले गेले आहेत? त्यांना फक्त सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं गेलं आणि एकही अधिकाऱ्याने वर्णद्वेषी कमेंट केली नाही. अधिकारी कधीही भांडण किंवा वाद घालत नाहीत, कारण त्यांचं काम सुरक्षा सुनिश्चित करणं आणि विमानतळावरील प्रोटोकॉलचं पालन करणं हे आहे.”
हेही वाचा:
Prasad Oak: “..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?”; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका
Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा घेतला निरोप