Ranbir-Alia: “धर्म, संस्कृतीविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यास आम्ही..”; बजरंग दलाचा बॉलिवूड सेलिब्रिटींना इशारा
रणबीर-आलियाला विरोध करण्यासाठी बजरंग दलाने महाकालेश्वर मंदिराबाहेर काळे झेंडे फडकावत निदर्शनं केली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली. काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याविरोधात नुकतंच उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराबाहेर निदर्शनं करण्यात आली. बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केली होती. आपल्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर-आलिया हे दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत उज्जैनला पोहोचले होते. मात्र रणबीरने हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्याला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला, असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं.
रणबीरच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय. या मुलाखतीत रणबीर गोमांसविषयी बोलताना दिसत आहे. 11 वर्षांपूर्वीच्या त्याच्या या वक्तव्यावरून सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला आणि त्याला विरोध केला जातोय.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत बजरंग दलाचे कार्यकर्ते अंकित चौबे म्हणाले, “आपल्या देशातील तरुणवर्ग हा रणबीरकडे आदर्श म्हणून पाहतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला नेटकऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. पण पाकिस्तानी अँकरसमोर गोमांस खाण्याबाबतचं त्याचं वक्तव्य हे सहन केलं जाणार नाही. त्यामुळेच आम्ही विरोध केला. आपल्या धर्माविषयी आणि संस्कृतीविषयी जर कोणी असं वक्तव्य करत असेल, तर त्याला विरोध केला जाईल. भविष्यातही जर कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीने धर्म आणि संस्कृतीविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, तर बजरंग दल त्याला विरोध नक्की करणार.”
रणबीर-आलियाला विरोध करण्यासाठी बजरंग दलाने महाकालेश्वर मंदिराबाहेर काळे झेंडे फडकावत निदर्शनं केली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तिथली परिस्थिती नियंत्रणात आणली. काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला.
या निदर्शनांविषयी महाकालेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आशिष सिंग ‘एएनआय’शी बोलताना म्हणाले, “मंदिराबाहेर निदर्शनं केली जाणार नाही असं बजरंग दलाकडून आधी सांगण्यात आलं होतं. तरीही आम्ही आमच्या वतीने मंदिराबाहेर सुरक्षा तैनात केली होती. काही सदस्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तर काहींना जाता आलं नाही. भविष्यात आम्ही अशा परिस्थितीची काळजी घेऊ.”
रणबीर-आलियाला मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही. दिग्दर्शक अयान मुखर्जीने दर्शन घेतलं. “रणबीर-आलिया माझ्यासोबत आत येऊ शकले नाहीत, याचं मला वाईट वाटलं”, अशी प्रतिक्रिया नंतर अयानने दिली.