न्याय द्या, नाही तर मीही बरं वाईट करून घेईन; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणाला आठवडा उलटला तरी पोलिसांना अजून आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके स्थापन केली आहेत. ठिकठिकाणी छापेमारीही सुरू केली आहे.
![न्याय द्या, नाही तर मीही बरं वाईट करून घेईन; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा न्याय द्या, नाही तर मीही बरं वाईट करून घेईन; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/02123310/Akanksha-Dubey-3.jpg?w=1280)
वाराणासी : भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला एक आठवडा उलटला तरी तिच्या पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाराणासी पोलीस आजमगड, पटना आणि मुंबईत समर सिंह आणि त्याच्या भाऊ संजय सिंह यांचा शोध घेत आहे. त्यासाठी छापेमारीही सुरू आहे. मात्र, या दोघाांना अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. पोलिसांनी समर सिंहच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केला आहे. मात्र, तरीही समर सिंह पोलिसांच्या जाळ्यात आलेला नाही.
आठवडा झाला तरी आपल्या लेकीच्या आत्महत्या प्रकरणातील तपास पुढे सरकलेला नाही. अजूनही आरोपी फरार आहेत. त्यामुळे आकांक्षाची आई मधू दुबे या अत्यंत संतापलेल्या आहेत. त्यांनी काल वाराणीसच्या पोलीस आयुक्त मुथा अशोक जैन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला न्याय द्या. नाही तर मीही आत्महत्या करेन, असा इशारा मधू दुबे यांनी दिलं आहे. तर समर सिंहला अटक करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल. तुम्ही काळजी करू नका. आकांक्षाला आम्ही न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन पोलीस आयुक्त मुथा अशोक जैन यांनी दिलं आहे.
योगींना भेटायचंय
दरम्यान, मधू दुबे यांनी पोलीस या प्रकरणात चालढकल करत असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणात सातत्याने वेळ मागत आहे. मी त्यांना वेळही देत आहे. मात्र, अजूनपर्यंत पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलिसांवर भरोसा तरी कसा करावा? मी पोलिसांना जेवढी नावं दिली होती. त्यापैकी एकाही व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली नाहीये, असं आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी सांगितलं. मला आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचं आहे. योगीच माझ्या मुलीला न्याय देईल. जर त्यांनी न्याय नाही दिला तर मी स्वत: आत्महत्या करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पोलीस म्हणते, आत्महत्याच
सारनाथच्या एका हॉटेलमध्ये आकांक्षाने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू खून नसल्याचं स्पष्ट झालं होतं. ही आत्महत्याच असल्याचं सांगितलं गेलं होतं. तिच्या शरीरावर कोणतेही व्रण नव्हते. त्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, तिच्या आईने काही लोकांवर संशय व्यक्त केला होता.