मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे बॉलीवूड अभिनेता सोनू सूद वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आयकर विभागाकडून तीन दिवस सोनू सूदचे घर, कार्यालय आणि इतर संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर शनिवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून (CBDT) सोनू सूद याने तब्बल 20 कोटी रुपयांचा कर बुडवल्याची माहिती दिली. यासंदर्भात अजूनही तपास सुरु असल्याचे CBDT कडून सांगण्यात आले.
प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल 20 कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.
During the course of search at the premises of the actor &his associates, incriminating evidence pertaining to tax evasion found. The main modus operandi followed by the actor had been to route his unaccounted income in form of bogus unsecured loans from many bogus entities: CBDT
— ANI (@ANI) September 18, 2021
सोनू सूदने परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडीदरम्यान काही कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदला मोठ्याप्रमाणावर परकीय चलनाच्या स्वरुपात देणगी मिळाली होती. हे पैसे त्याने खर्च केल्याचा संशय प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
गेल्यावर्षी देशात कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागले तेव्हा सोनू सूद गरिबांचा मसिहा म्हणून उदयाला आला होता. लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि प्रवासाची इतर सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेक मजूर मुंबईत अडकून पडले होते. त्यावेळी सोनू सूद याने स्वखर्चाने या सर्व मजूरांसाठी विशेष बसची सोय केली होती. त्यामुळे सोनू सूद प्रचंड चर्चेत आला होता.
caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.
सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.
सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.