Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ थिएटरमध्ये पहायचाय? त्याआधी ‘हे’ नक्की वाचा!
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवस उरले आहेत. ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. संपूर्ण बॉलिवूडला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. प्रेक्षकांमध्येही त्याविषयी बरीच उत्सुकता आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट बघायला जाण्याआधी त्याबद्दलची काही माहिती जाणून घेऊयात..
1- प्रदर्शनाची तारीख ब्रह्मास्त्र हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. हिंदीसोबतच कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ या भाषांमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांकडून ‘ब्रह्मास्त्र’च्या तेलुगू व्हर्जनचं जोरदार प्रमोशन केलं जातंय.
2- सर्टिफिकेशन या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकतील.
3- कलाकार आणि भूमिका ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रणबीर यामध्ये शिवा नावाच्या डीजेची भूमिका साकारत आहे. ‘ब्रह्मास्त्र की किस्मत का सिकंदर’ अशी त्याची ट्रेलरमध्ये ओळख करण्यात आली. तर आलिया इशाची भूमिका साकारतेय. बिग बी यामध्ये गुरूंच्या भूमिकेत आहेत. मौनी रॉय चित्रपटात जुनून ही खलनायकी भूमिका साकारत आहे. दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यामध्ये अनिशच्या भूमिकेत आहेत. अभिनेता शाहरुख खानसुद्धा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
4- बजेट ब्रह्मास्त्र हा चित्रपट तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा सर्वांत महागडा चित्रपट म्हटलं जात आहे.
5- चित्रपटाचा अवधी चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मास्त्र हा 2 तास 46 मिनिटं आणि 54 सेकंदांचा आहे.
6- ओपनिंग कमाई ब्रह्मास्त्रची ॲडव्हान्स बुकिंग चांगली झाल्याने पहिल्या दिवशी हा चित्रपट 20 ते 25 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.