Brahmastra: ज्युनियर एनटीआरचे चाहते भडकले; आयोजकांकडून माफीची मागणी
हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याठिकाणी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.
‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांकडून त्याचं जोरदार प्रमोशन केलं जातंय. हैदराबादमध्ये (Hyderabad) ‘ब्रह्मास्त्र’च्या मेगा प्री-रिलीज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रमाच्या फक्त एक तास आधी तो रद्द केल्याने चाहते नाराज झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सेलिब्रिटी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. यानंतर नाराज झालेल्या चाहत्यांनी आयोजकांकडून माफीची मागणी केली आहे.
हैदराबादमधल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याठिकाणी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता. सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असल्याने पोलीस कर्मचारी विसर्जनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये शनिवारी एका राजकीय पक्षाची रॅली असल्याने त्याठिकाणीही पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्रच्या कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळू शकला नाही. याच कारणामुळे ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.
View this post on Instagram
ब्रह्मास्त्रच्या या कार्यक्रमाला आलिया भट्ट, रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी, आणि ज्युनिअर एनटीआर उपस्थित राहणार होते. आपल्या लाडक्या कलाकारांना पाहता आलं नाही यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले चाहते नाराज झाले. कार्यक्रमाच्या फक्त एक तास आधी हे सेलिब्रिटी येणार नसल्याचं जाहीर केलं गेलं. ज्युनिअर एनटीआरच्या अनेक फॅन पेजेसवरून ही नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘प्रॉडक्शन हाऊस आणि आयोजकांनी आमची माफी मागितली पाहिजे’, असं ट्विट चाहते करत आहेत.
‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षातील हा सर्वांत चर्चेतला आणि बिग बजेट चित्रपट आहे. तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याचं कळतंय.