Dhaakad: कंगनाचा ‘धाकड’ फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांना विकावं लागलं ऑफिस? अखेर सत्य आलं समोर
रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक कोटी रुपयांहून कमी गल्ला जमवला होता. ‘धाकड’मध्ये कंगनाचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. मात्र कथानकाच्या बाबतीत हा चित्रपट सपशेल फेल ठरला.
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘धाकड’ (Dhaakad) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. चित्रपटाची कमाई इतकी कमी झाली की काही ठिकाणी वितरकांनी धाकडचे शो रद्द केले. काही ठिकाणी चित्रपटाची कमाई फक्त हजारांमध्ये झाली. कंगनाचा धाकड फ्लॉप झाल्यानंतर निर्माते (Dhaakad producer) दीपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचं कार्यालय विकावं लागल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता दीपक मुकुट यांनी स्वतः पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे. रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एक कोटी रुपयांहून कमी गल्ला जमवला होता. ‘धाकड’मध्ये कंगनाचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांना पहायला मिळाला. मात्र कथानकाच्या बाबतीत हा चित्रपट सपशेल फेल ठरला. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटं विकली गेली होती आणि त्यातून केवळ 4420 रुपयांची कमाई झाली होती.
‘धाकड’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला आणि इतक्या खराब कामगिरीनंतर चित्रपटाला OTT वर रिलीज करण्यात कोणती अडचण आली, याबाबत दीपक मुकुट हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाले. “या सर्व निराधार अफवा आणि खोट्या बातम्या आहेत. माझी बहुतांश नुकसान भरपाई आधीच झाली आहे आणि जे अजून काही शिल्लक आहे ते नंतर वसूल केलं जाईल,” असं ते म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कामगिरीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, ”आम्ही खूप विचार करून आणि मेहनत घेऊन ‘धाकड’ हा चित्रपट बनवला. काय चूक झाली हे मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की लोकांची स्वतःची एक आवड आहे. लोकांना जे आवडतं ते पाहतात आणि जे नाही आवडत ते पाहत नाही. पण आम्हाला अभिमान आहे की आम्ही एक महिला लीडसह एक चांगला स्पाय-थ्रिलर चित्रपट बनवला आहे आणि अशा शैलीवर आतापर्यंत फार कमी चित्रपट बनले आहेत.”
20 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कंगनासह शाश्वत चॅटर्जी, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपट वितरकांनीही थिएटरमधून धाकड हा चित्रपट काढून टाकला. जवळपास 80 ते 90 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला. विशेष म्हणजे ओटीटीवरही प्रदर्शित करण्यासाठी अडचणी येत असल्याचं समजतंय. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई न केल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्सही डील करण्यासाठी कचरत असल्याची चर्चा आहे.
‘धाकड’च्या अपयशाबाबत कंगनाचं स्पष्टीकरण-
‘2019 मध्ये मी 160 कोटींचा ‘मणिकर्णिका’ हा सुपरहिट चित्रपट दिला. 2020 हे वर्ष कोविडचं होतं. त्यानंतर 2021 मध्ये मी माझ्या करिअरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा ‘थलायवी’ हा चित्रपट दिला. जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता आणि त्यालाही यश मिळालं. सध्या माझ्या बाबतीत बरीच नकारात्मकता पसरवली जातेय, पण 2022 हे माझ्यासाठी ब्लॉकबस्टर वर्ष ठरलं. यावर्षी मी लॉक अपचं सूत्रसंचालन केलं आणि अजूनही हे वर्ष संपलेलं नाही. मला अजूनही खूप आशा आहे’, अशी पोस्ट कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिली होती.