ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना गेल्या आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांनंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला. व्यायाम करत असताना अचानक पाठीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना कोणता धडा मिळाला, याविषयी त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलंय. “प्रत्येकाला आपली क्षमता काय आहे हे माहित असावं आणि त्यानुसारच त्याने कामं करावीत. क्षमतेपेक्षा अधिक काहीच करू नये,” असं ते म्हणाले. धर्मेंद्र 86 वर्षांचे असून व्यायाम करताना त्यांच्या पाठीच्या स्नायूंवर अधिक ताण पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. (Dharmendra Health Update)
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत धर्मेंद्र म्हणाले, “मित्रांनो, कोणतीही गोष्ट अती करू नका. तुमच्या क्षमतेला ओळखा. मी अती केल्यानेच असं झालं आणि आता मला चांगलाच धडा मिळाला आहे. अती व्यायाम केल्याने माझ्या पाठीच्या स्नायूंवर अधिक ताण पडला. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. हे सर्व खूप कठीण होतं. पण तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी पुन्हा सुखरुप घरी परतलोय. त्यामुळे माझी काळजी करू नका. मी आता माझी अधिक काळजी घेईन.”
या व्हिडीओवर धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली. तर ‘सर तुम्ही कृपया स्वत:ची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा’, असं अभिनेत्री रुहानिका धवनने लिहिलं. ‘मी माझ्या आजोबांइतकंच तुमच्यावर प्रेम करतो धरम अंकल’, अशी कमेंट गायिका सुखमणी कौर बेदीने केली. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा यानेही धर्मेंद्र यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. ‘सर तुम्ही लेजंड आहात, लव्ह यू फॉरेव्हर’, असं त्याने लिहिलंय.
‘धर्मेंद्र यांना पाठीत दुखू लागल्याने चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाकडून रविवारी देण्यात आली. धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. यामध्ये जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.