Aamir Khan | मिच्छामि दुक्कडम्!; आमिर खानने अचानक कुणाची मागितली माफी?
Aamir Khan | आपण माणसं आहोत आणि आपल्याकडून चुका होतातच. कधी शब्दातून, कधी कृतीतून. कधी अनावधानाने, कधी रागातून, कधी मौनातून, कधी मस्करीतून या चुका होत असतात.
मुंबई: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. आमिर खानच्या बहुचर्चित लालसिंग चढ्ढा (lalsingh chaddha) या सिनेमावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे हा सिनेमा जोरदार आपटला. आमिर खानचा हा चित्रपट आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट (movie) असल्याचं मानलं जात आहे. हा चित्रपट केवळ फ्लॉप झाला नाही, तर या सिनेमावरून आमिर खान ट्रोलही झाला. अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली आहे. या संपूर्ण वाद-प्रतिवादा नंतर आमिर खानने अखेर मौन सोडलं आहे. आमिर खानने आपल्या प्रेक्षकांची जाहीरपणे माफी मागितली आहे. त्याने एक ट्विट करून ही माफी मागितली आहे.
आमिर खान प्रोडक्शनकडून ट्विटरवर एक क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. हा माफीनाम्याचा व्हिडिओ आहे. क्लिपची सुरुव मिच्छामि दुक्कडम् या शब्दाने होते. त्यावर हात जोडलेलं एक इमोजीही दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर माफी व्यक्त करणारा आवाज ऐकायला येतो. सोबत स्क्रिनवर अक्षरेही दिसतात. पण हा आमिर खानचा आवाज नाहीये. या भावना आमिर खान प्रोडक्शनने व्यक्त केल्या म्हणजे हा माफीनामा आमिर खानचाच असल्याचं स्पष्ट होतंय.
आमिर काय म्हणाला?
आपण माणसं आहोत आणि आपल्याकडून चुका होतातच. कधी शब्दातून, कधी कृतीतून. कधी अनावधानाने, कधी रागातून, कधी मौनातून, कधी मस्करीतून या चुका होत असतात. मी कोणत्याही प्रकारे तुमचं मन दुखावलं असेल, तर मी मन, शब्द आणि शरीराने तुमची माफी मागतो. मिच्छामि दुक्कडम्, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यूजर्सही संभ्रमात
आमिर खान प्रोडक्शनच्या या ट्विटमध्ये कोणताही संदर्भ न देता माफी मागण्यात आली आहे. त्यामुळे लोकही आश्चर्यचकीत झाले आहेत. आमिर खानच्या फॅन्सचा संभ्रम झाला आहे. त्यामुळे नेटीझन्सनी ट्विट करून आमिर खानला सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. लाल सिंग चढ्ढा सारखी चुकी परत करू नका सर प्लीज, असं एकाने ट्विट केलं आहे. तर, दुसऱ्याने तुम्ही आधीच हे सांगितलं असतं तर लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाला नसता, असं म्हटलं आहे. काही यूजर्सने तर आमिर खानची बाजू घेतली आहे. सर, तुमची काहीच चुकी नाही. तुम्ही महान अभिनेते आणि व्यक्तीही आहात, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. काही लोकांच्या मते आमिर खानचं अकाऊंट हॅक झालं असावं.
कोणत्या कारणाने माफी?
आमिर खानकडून माफी मागण्याबाबत अनेक तर्क व्यक्त केले जात आहे. क्लिपमधील टेक्स्ट वाचून त्याने आधीच्या वादग्रस्त विधानावर माफी मागितली असावी असं वाटतं. आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात आला होता. आमिरच्या जुन्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला होता असं सांगितलं जातं. त्यामुळेच आमिरचा चित्रपट आपटल्याचं सांगितलं जातं. आपल्या पत्नीला या देशात राहण्याची भीती वाटते. ती देश सोडू इच्छिते, असं आमिरने 2015मध्ये म्हटलं होतं.