मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting Scam) या ऑनलाईन सट्टेबाजीच्या घोटाळ्याने बॉलिवूडला चांगलंच घेरलं आहे. या घोटाळ्यात बड्या बड्या अभिनेत्यांचं नाव येत आहे. या घोटाळ्यात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचं नाव आलं आहे. त्याला चौकशीचं समन्सही बजावण्यात आलं आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी, कपिल शर्मा आणि हिना खान यांचंही नाव घेतलं जात आहे. या चारही जणांना ईडीने समन्स बजावलं आहे. या पैकी श्रद्धा कपूरची आजच चौकशी होणार आहे. तर बाकींच्याची चौकशी कधी होणार याची माहिती अजून समोर आलेली नाहीये.
हुमा कुरैशी, हिना खान आणि कपिल शर्मा हे तिघेही दुबईत एका आलिशान पार्टीत परफॉर्म करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी काही सेलिब्रेटिंनी या ॲपला एंडॉर्स केलं होतं. त्यामुळे हे सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहेत. हा ॲप लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो. या प्रकरणात सर्वात आधी रणबीर कपूरचं नाव आलं होतं. त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, रणबीरने ईडीकडे दोन आठवड्याची मुदत मागितली आहे. मात्र, ईडीने अद्यापपर्यंत रणबीरला मुदत देण्याबाबतचं काहीच स्पष्ट केलेलं नाहीये.
ईडीच्या रडारवर आणखी काही सेलिब्रिटी आहेत. त्यात आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, भारती सिंह, नेहा कक्कड. एली अवराम, सनी लियोनी, भाग्यश्री, पल्कित सम्राट कीर्ति खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा अभिषेक यांची ही नावे आहेत.
या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याचं लग्न फेब्रुवारीत झालं होतं. संयुक्त अरब अमिरातमध्ये हा विवाह पार पडला. या लग्न सोहळ्यावर 200 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला. या आलिशान विवाह सोहळ्याचा व्हिडीओ भारतीय एजन्सीच्या हाती लागला आहे. त्यामुळे या लग्नात परफॉर्म करण्यासाठी जेवढे कलाकार गेले होते, ते सर्व ईडीच्या रडारवर आले आहेत.
ईडीने याबाबतचे डिजीटल पुरावेही गोळा केले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबई, भोपाळ, कोलकाता येथील हवाला ऑपरेटरांवर छापेमारी केली होती. त्यांनी या इव्हेंटसाठी मुंबईच्या इव्हेंट फर्मला पैसे पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इथूनच गायिका नेहा कक्कड, सुखविंदर सिंग, भारती सिंह आणि भाग्यश्रीला परफॉर्म करण्यासाठी पेमेंट करण्यात आला होता.