‘आई, तू मला आतून ओळखतेस, मी तुझ्यावर खूप…’, नितीन देसाई आईला उद्देशून बघा काय म्हणाले होते

| Updated on: Aug 02, 2023 | 5:24 PM

नितीन देसाई हे खूप संवेदनशील होते. ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन द्यायचे. त्यांचं संवेदनशील असणं, माणुसकीची जाणीव ठेवणं या स्वभावासाठी त्यांनी एकदा आपल्या आईचे आभार मानले होते.

आई, तू मला आतून ओळखतेस, मी तुझ्यावर खूप..., नितीन देसाई आईला उद्देशून बघा काय म्हणाले होते
Follow us on

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज अतिशय टोकाचा निर्णय घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. नितीन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतील नामांकीत नाव होतं. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटासांठी सेट उभारले. त्यांचा कर्जत येथे मोठा स्टुडिओ देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ते कर्जाच्या ओझ्याखाली होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. नितीन देसाई यांनी कर्जामुळे स्वत:ला संपवलं की दुसरं काही कारण होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण त्यांनी अशाप्रकारे एक्झिट घेणं हे कुणालाही पटलेलं नाही. नितीन देसाई यांच्या निधनामुळे कलाविश्वासह राजकीय विश्वही हळहळलं आहे. नितीन देसाई यांचे मराठी आणि हिंदी सिनेमा विश्वाशिवाय राजकीय क्षेत्रातही अनेक मित्र होते. त्यांचं असं निघून जाणं हे कुणालाही रुचलेलं नाही.

नितीन देसाई हे खूप संवेदनशील होते. ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन द्यायचे. त्यांचं संवेदनशील असणं, माणुसकीची जाणीव ठेवणं या स्वभावासाठी त्यांनी एकदा आपल्या आईचे आभार मानले होते. नितीन देसाई यांचं आई आणि वडिलांवर खूप प्रेम होतं. ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा आई-वडिलांविषयीचं आपलं प्रेम व्यक्त करायचे. ते खूप हळवे होते.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर त्यांच्या आईसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संबंधित फोटो देसाई यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोसोबत नितीन यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी आपल्या आईचे ऋण मानले होते.

नितीन देसाई यांनी 9 मे 2021 ला ‘मदर्स डे’च्या निमित्ताने आईला उद्देशून इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईविषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी आपल्या आईबद्दलचे ऋण व्यक्त केले होते.

“आई, मी जे काही आहे ते सर्व तुझ्यामुळे आहे. मला दररोज प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. तू मला आतून ओळखतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझी सर्वात मोठी प्रेरणा आणि उत्सवमूर्ती आहे. मला सदैव पाठिंबा दिल्याबद्दल आणि मला माणूस म्हणून घडवल्याबद्दल आई तुझे खूप खूप आभार. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद”, अशा शब्दांत नितीन देसाई यांनी आपल्या आईबद्दलच्या भावना इन्स्टाग्रामव व्यक्त केल्या होत्या.

नितीन यांनी 15 जून 2021 ला आपल्या वडिलांसोबत इन्साग्रामवर आपल्या वडिलांसोबतचा एक खास फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. “जेव्हा स्वप्न सत्यात उतरतं… माझ्या वडिलांकडून मला सर्वात चांगलं गिफ्ट मिळालं ते म्हणजे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी माझी ही ट्रॉफी माझ्या वडिलांना समर्पित करतो. माझ्या संपूर्ण टीमचे धन्यवाद. लगान चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाले. याचा आनंद साजरा करतोय”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज कलाकार, राजकारणी यांच्याकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. नितीन यांनी टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी भावना सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.