Kashmir filesमधील तथ्य चुकीची, मुस्लिम आणि शिखांचं बलिदान विसरले; ओमर अब्दुल्ला कडाडले
'द काश्मीर फाईल्स' (Kashmir files) या सिनेमावरून अखेर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (omar abdullah) यांनी मौन सोडलं आहे. या सिनेमात मुस्लिम आणि शिखांचं बलिदान दुर्लक्षित केलं आहे.
श्रीनगर: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir files) या सिनेमावरून अखेर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (omar abdullah) यांनी मौन सोडलं आहे. या सिनेमात मुस्लिम आणि शिखांचं बलिदान दुर्लक्षित केलं आहे. केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम आणि शीखही दहशतवादामुळे पीडित होते. काश्मीर फाईल्स हा सिनेमा व्यावसायिक असता तर काहीच अडचण नव्हती. मात्र सिनेनिर्माते हा सिनेमा वास्तवावर आधारीत असल्याचा दावा करत आहेत तर त्यातील तथ्य चुकीची आहेत, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ओमर अब्दुल्ला आज दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील दमल हांजी येथे आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना काश्मीर फाईल्स सिनेमातील वास्तवावरच बोट ठेवलं. ज्यावेळी काश्मिरी पंडितांच्या (kashmir pandit) पलायनाची दुर्देवी घटना घडली. तेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री नव्हते. जगमोहन हे राज्यपाल होते. केंद्रात व्ही.पी. सिंग यांची सत्ता होती आणि त्यांना भाजपचा बाहेरून पाठिंबा होता. हे वास्तव सिनेमात का दाखवलं नाही, याबाबतचं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं.
काश्मिरी पंडित दहशतवादाची शिकार झाले असतील तर आम्हाला त्याबद्दल खेद आहे. परंतु, ज्यांना अतिरेक्यांनी आपल्या बंदुकीने निशाणा बनवलं होतं त्या मुस्लिम आणि शिखांनाही विसरताही कामा नये. बहुसंख्याक समुदायातील अनेक लोकांची अजून काश्मीर वापसी व्हायची बाकी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काश्मिरी पंडित यावेत असं वाटत नाही का?
जे लोक आपली घरेदारे सोडून गेले होते. त्यांना पुन्हा परत आणण्यासाठी एक वातावरण तयार केलं पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून काहीही साध्य होणार नाही. ज्या लोकांनी हा सिनेमा बनवला आहे, त्यांना काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमध्ये यावेत असं वाटत नसावं असं मला वाटतं. काश्मिरी पंडितांनी कायम स्वरुपी काश्मीर बाहेर राहावे अशा पद्धतीनेच हा सिनेमा बनवला गेला आहे, असंही ते म्हणाले.
त्यांचा परतीचा मार्ग मोकळा होणार आहे का?
जगभरात एकाच समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 32 वर्षांपूर्वी जे झालं. त्यामुळे काश्मिरी खूष नाहीयेत. काश्मिरी धर्मांध असून ते इतर धर्मिय लोकांना सहन करत नाहीत, अशी मानसिकता तयार केली जात आहे. यातून काय साध्य होणार आहे? असं केल्याने काश्मीर सोडून गेलेल्यांचा मार्ग परतीचा मार्ग मोकळा होणार आहे का? असा सवालही त्यांनी केला. काश्मिरी मुस्लिमांबाबत आज द्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे काश्मीरच्या बाहेर शिकणाऱ्या आमच्या मुलांना त्याचं नुकसान होऊ शकतं अशी मला भीती वाटतेय, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
The Kashmir Files मध्ये क्रूरतेची हद्द पार करणारा ‘बिट्टा’ कोण आहे? जो म्हणाला, “आईलाही मारू शकतो”
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा
‘Jhund’ आणि ‘The Kashmir Files’ने समाजात दोन गट पाडले? नागराज मंजुळे म्हणतात..