Govinda: ‘बॉयकॉट ट्रेंड’वर गोविंदाचं मोठं वक्तव्य; सेलिब्रिटींना दिला मोलाचा सल्ला
आमिर, रणबीरने ध्यानात घ्यावी 'ही' गोष्ट; 'बॉयकॉट ट्रेंड'वर गोविंदा म्हणाला..
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांविरोधात ‘बॉयकॉट’चा ट्रेंड (Boycott Trend) चालवला गेला. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ पासून ते रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’पर्यंतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली. यामागचं कारण होतं कलाकारांचं वादग्रस्त विधान. आमिर आणि रणबीर यांनी काही काळापूर्वी वादग्रस्त विधानं केली होती. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्या चित्रपटांविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड चालवला. याचा फटका चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईवरही पहायला मिळाला. या बॉयकॉट ट्रेंडवर आता अभिनेता गोविंदाने (Govinda) आपलं मत व्यक्त केलं आहे.
‘बिग एफएम’शी संबंधित एका कार्यक्रमात त्यांना बॉयकॉट ट्रेंडविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. “आपल्या तोंडून एखादं चुकीचं वाक्य निघायचं आणि त्यानंतर आपल्याविरोधात बॉयकॉट ट्रेंड चालवला जाईल अशी भीती तुम्हाला वाटते का”, असा सवाल गोविंदाला विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना गोविंदा म्हणाला, “मला वाटतं या गोष्टीला व्यायाम म्हणून स्वीकारलं पाहिजे. योग्य नियमांनी आपण वागलो तर पुढे जाऊन त्याचा त्रास कधीच होणार नाही. विचार करून बोलायची सवय लागली तर बोलल्यानंतर विचार करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे त्यात काही चुकीचं नाही.”
“आपण प्रेक्षकांना जनता जनार्दन म्हणतो, तर या गोष्टीला मानलंसुद्धा पाहिजे. जर आपण चुकीचं वागलो किंवा बोललो असं वाटत असेल तर त्याची माफीसुद्धा मोकळ्या मनाने मागावी. यात काहीच वाईट नाही”, असं तो पुढे म्हणाला.
मी माझी प्रत्येक गोष्ट पत्नीला विचारल्याशिवाय करत नाही, असंही तो यावेळी मस्करीत म्हणाला. “माझा हिरो नंबर वन हा चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. पण जोरू का गुलाम हासुद्धा माझा चित्रपट नक्की पहा”, अशी मस्करी गोविंदाने केली.