Mogul: ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर गुलशन कुमार यांच्या बायोपिकबाबत मोठा निर्णय; ‘मोगुल’वरून हटवलं आमिरचं नाव?
'मोगुल' चित्रपटातील नफ्याबाबत अक्षय आणि भूषण यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर अक्षयने तो बायोपिक करण्यास नकार दिला. तेव्हा या चित्रपटात अक्षय कुमारपेक्षा मोठा स्टार आणणार असल्याचं वक्तव्य भूषण कुमारने केलं होतं.
देशातील सर्वात मोठी चित्रपट आणि संगीत कंपनी स्थापन करणाऱ्या गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचा बायोपिक ‘मोगुल’ (Mogul) आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचं कळतंय. ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आमिर खान (Aamir Khan) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. मात्र चित्रपटाच्या स्क्रिप्टवरून दिग्दर्शक आणि टी-सीरीज यांच्यात सुरू असलेल्या मतभेदामुळे आता चित्रपटाला पूर्णविराम मिळाला आहे. एकीकडे आमिरच्या लाल सिंग चड्ढाला देशभरात बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. तर दुसरीकडे ‘मोगुल’चे दिग्दर्शक सुभाष कपूर हे आगामी ‘जॉली एलएलबी 3’च्या शूटिंगच्या तयारीला लागले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या बायोपिकबाबत जोरदार चर्चा होती.
आधी अक्षय कुमारची निवड
खरंतर मोगुल हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी अक्षय कुमार करणार होता. परंतु चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार आणि अक्षय यांच्यातील कथित मतभेदानंतर आमिर खानने गुलशन कुमारची भूमिका साकारण्यास होकार दिला. आमिरच्या टीमने या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं की, ‘लाल सिंग चड्ढा’चं काम संपवून तो ‘मोगुल’ चित्रपटावर काम सुरू करणार आहे. पण या चित्रपटासाठी पैसे गुंतवणाऱ्या टी-सीरीज कंपनीने त्याचं शूटिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं आहे.
गुलशन कुमार यांचा बायोपिक
देशातील संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचं काम गुलशन कुमार यांनी केलं होतं. महागड्या कॅसेटच्या जमान्यात गुलशन कुमार यांनी दिल्ली एनसीआरमध्ये सुपर कॅसेट इंडस्ट्रीज नावाने कारखाना सुरू करून शोरूममध्ये विकल्या जाणाऱ्या कॅसेटची विक्री फूटपाथवर केली. गुलशन कुमार यांनी सर्वात आधी हिट गाण्यांचं कव्हर व्हर्जन स्वस्तात विकायला सुरुवात केली आणि नंतर नवीन चित्रपटांचे संगीत हक्क विकत घेऊन ते लोकांपर्यंत कमी किंमतीत पोहोचवू लागले. या कव्हर व्हर्जनसाठी गुलशन कुमार यांनी कॉपीराइट कायद्यातील काही तरतुदींचा अवलंब केला आणि या संदर्भात सुरू झालेली कायदेशीर लढाईही जिंकली.
पाच वर्षांपूर्वीच आला होता पोस्टर
ज्या काळात चित्रपटांच्या संगीताचे हक्क कोट्यवधी रुपयांमध्ये विकले जायचे, तेव्हा त्याच म्युझिक राइट्सवरून गुलशन कुमार यांची हत्या झाली होती आणि या प्रकरणात अंडरवर्ल्डचाही हात असल्याचं समोर आलं. आता गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारला त्याच्या वडिलांची ही कहाणी जगासमोर चित्रपटाच्या माध्यमातून आणायची आहे. या बायोपिकची संपूर्ण स्क्रिप्ट सुभाष कपूर यांनी तयार केली होती आणि या चित्रपटात अक्षय कुमारला आणणारे तेच होते. चित्रपटाचं पहिलं पोस्टर 15 मार्च 2017 रोजी प्रदर्शित करण्यात आलं होतं.
My association with Him began with my very first film. He was The Emperor Of Music! Now know His story… #Mogul, The Gulshan Kumar story! pic.twitter.com/lD8V6s4HeX
— Akshay Kumar (@akshaykumar) March 15, 2017
‘मोगुल’ चित्रपटातील नफ्याबाबत अक्षय आणि भूषण यांच्यात मतभेद झाले आणि त्यानंतर अक्षयने तो बायोपिक करण्यास नकार दिला. तेव्हा या चित्रपटात अक्षय कुमारपेक्षा मोठा स्टार आणणार असल्याचं वक्तव्य भूषण कुमारने केलं होतं. त्यानुसार चार वर्षांपूर्वीच आमिर खानचं नाव चार या चित्रपटाशी जोडलं गेलं होतं. मात्र आता हा बायोपिक बनणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.