मुंबई : प्रसिद्ध अभिनेता प्रेम चोप्रा (Famous actor Prem Chopra) बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहेत. त्यांनी तब्बल 60 वर्षे बॉलिवूड चित्रपटांवर खलनायक म्हणून राज्य केले आणि प्रत्येक अभिनेत्याला अपेक्षित असलेले स्थान प्राप्त केले. अभिनेते प्रेम चोप्रा यांचा जन्म 23 सप्टेंबर 1935ला लाहोर येथे झाला. 1947मध्ये भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर प्रेम आपल्या कुटुंबासह शिमलाला स्थायिक झाले. प्रेम यांचे सुरुवातीचे शिक्षण शिमलामध्येच झाले.
यानंतर त्याने पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली. या काळात प्रेम यांचा अभिनयाकडे कल होता आणि त्याने महाविद्यालयात नाट्य कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रेम अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले होते. येथे आल्यानंतर प्रेमला चित्रपट जगतात प्रवेश करणेही सोपे नव्हते. या दरम्यान, संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वर्तमानपत्र विकण्यास सुरूवात केली. त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या परिसंचरण विभागातही काम केले.
प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांना 1960च्या ‘मुड-मुड के ना देख’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही. यानंतर प्रेम चोप्रा यांना ‘चौधरी कर्नल सिंह’ या पंजाबी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. 1960मध्ये प्रेम चोप्राचा ‘वो कौन थी’ हा चित्रपट आला. प्रेम चोप्रा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि प्रेम यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रेम चोप्रा यांच्या काही गाजलेल्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘हम हिंदुस्तानी’, ‘शहीद’, ‘मेरा साया’, ‘प्रेम पुजारी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘आंसू बने अंगारे’, ‘फूल बने अंगारे’, ‘जाने भी दो यारों’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. प्रेम चोप्रा आजकाल चित्रपटांपासून दूर आहेत, परंतु त्यांच्या चित्रपटांचे काही संवाद अजूनही लोकांच्या जिभेवर वारंवार येतात. बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेम चोप्रा यांच्या चित्रपटांचा गाजलेला संवाद म्हणजे ‘प्रेम नाम है मेरा नाम प्रेम चोप्रा… ..’ (बॉबी), जिनके घर शीशे के बने होते हैं…, वो बत्ती बुझाकर कपड़े बदलते हैं… (सौतन), राजनीति की भैंस के लिए दौलत की लाठी की जरूरत होती है… (खिलाड़ी), मैं वो बला हूं, जो शीशे से पत्थर को तोड़ता हूं …(सौतन), मैं जो आग लगाता हूं उसे बुझाना भी जानता हूं …(कटी पतंग) आजही लोकांच्या तोंडावर आहेत.
प्रेक्षकांना प्रेम चोप्रा त्यांच्या योगदानासाठी आणि चित्रपटांमधील अभिनयासाठी नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्यांच्या पत्नीचे नाव उमा चोप्रा आहे. प्रेम चोप्रा आणि उमा यांना तीन मुली राकिता, पुनीता आणि प्रेरणा आहेत.
‘बिग बॉस ओटीटी’ संपताच करण जोहर लागला कामाला, एक-दोन नव्हे तब्बल चार चित्रपटांची केली डील!