Happy Birthday Manish Malhotra | कधीकाळी महिन्याला 500 रुपये कमावणारा कारागीर बनला आघाडीचा डिझायनर, जाणून घ्या मनीष मल्होत्राबद्दल…
मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) हा केवळ बॉलिवूड सेलिब्रिटींचा सर्वात आवडता फॅशन डिझायनर नाही, तर तो भारतातील सर्वात प्रसिद्ध डिझायनर्सपैकी एक आहे. रॅम्प वॉक असो, रेड कार्पेट असो, कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा चित्रपटातील हिरो-हिरोईनचे पोशाख असो, मनीष मल्होत्राच्या डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये सगळे दिग्गज चेहरे दिसतात.
मुंबई : मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) हा केवळ बॉलिवूड सेलिब्रिटींचा सर्वात आवडता फॅशन डिझायनर नाही, तर तो भारतातील सर्वात प्रसिद्ध डिझायनर्सपैकी एक आहे. रॅम्प वॉक असो, रेड कार्पेट असो, कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा चित्रपटातील हिरो-हिरोईनचे पोशाख असो, मनीष मल्होत्राच्या डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये सगळे दिग्गज चेहरे दिसतात. मात्र, आज मनीष जिथे आहे तिथे पोहोचणे त्याच्यासाठी तितके सोपे नव्हते. वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि समाजाच्या प्रश्नांना तोंड देताना त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागले.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत या प्रसिद्ध डिझायनरने आपल्या सामान्य मुलापासून प्रसिद्ध डिझायनर बनण्याची कहाणी सांगितली होती. मनीष म्हणाला की, तो पूर्णपणे पंजाबी वातावरणात वाढला आहे. त्याला जे काही करायचे आहे, त्यासाठी लहानपणापासूनच आईची पूर्ण साथ मिळाली. अभ्यासाच्या बाबतीत तो जरा कच्चा होता, कारण त्याला वाचन खूप कंटाळवाणं वाटत होतं. बॉलिवूडवरील प्रेम व्यक्त करताना तो म्हणाला की, मला चित्रपट पाहण्याची इतकी आवड आहे की, मी प्रत्येक नवीन प्रदर्शित होणारा चित्रपट पाहण्यासाठी जायचो.
आईची साडी निवडण्यापासून झाली सुरुवात!
सहावीत असताना तो एका पेंटिंग क्लासला जॉईन झाला होता. रंग आणि कलेशी संबंधित हा वर्ग त्याला खूप आवडला. चित्रपटांवरील प्रेम, चित्रकलेची आवड आणि आईच्या कपड्यांकडे पाहणे या गोष्टींमुळेच त्याचे फॅशनवरील प्रेम वाढले. लहान वयातही तो आईला साडी निवडण्यात मदत करायचा आणि तिला त्याबद्दल सल्लेही द्यायचा.
पहिला पगार फक्त 500 रुपये!
मनीषचा फॅशन जगताशी पहिला संबंध कॉलेजच्या काळात आला. मॉडेलिंगसोबतच त्याने एका बुटीकमध्ये काम करायला सुरुवात केली, जिथे त्याने डिझायनिंगचे बारकावे शिकून घेतले. या ठिकाणी काम करण्यासाठी त्याला महिना 500 रुपये पगार दिला जात होता. त्याला त्याच्या कमी पगाराबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. कारण तो परदेशात शिकण्यासाठी जाऊ शकत नव्हता, म्हणून हे बुटीक त्याच्यासाठी सर्वात मोठे शिकण्याचे माध्यम होते.
‘रंगीला’साठी पटकावला पहिला फिल्मफेअर पुरस्कार
मनीष मल्होत्राने आपल्या क्षेत्रात मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तो तासनतास बसून सतत वेगवेगळ्या स्केचेसवर काम करत असे. अखेर त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याला पहिला मोठा ब्रेक मिळाला. तो जुही चावलाच्या चित्रपटात डिझायनर म्हणून काम करणार होता. मात्र, मनीषच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला तो ‘रंगीला’ हा चित्रपट, ज्यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
कॉस्च्युम डिझायनर ते फॅशन डिझायनर असा प्रवास…
करिअरच्या सुरुवातीला जेव्हा मनीषला काम मिळायचे, तेव्हा निर्माते त्याच्यावर नाराज व्हायचे, कारण तो कथा आणि पात्रांबद्दल खूप प्रश्न विचारायचा. तर, निर्मात्यांना फक्त त्यांचे स्टार पडद्यावर छान दिसावेत अशी इच्छा होती. मनीषने स्पष्ट केले की, त्याला कपड्यांचे डिझाइन करण्यापेक्षा आणखी बरेच काही करायचे आहे. त्याचा हा दृष्टिकोनही नंतर सर्वांनाच आवडला आणि त्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. मनीष मल्होत्राने 2005मध्ये त्याचे स्वतःचे लेबल लाँच केले.
आजही बदलली नाही ‘ही’ एक गोष्ट!
एकेकाळी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करणारा मनीष मल्होत्रा आजच्या काळातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. परंतु, त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासून आजपर्यंत एक गोष्ट अशी आहे जी अजिबात बदललेली नाही. मनीषने एक मुलाखतीत सांगितले की, आजही तो शोच्या आधी खूप नर्व्हस होतो. तथापि, त्याला त्याचा त्रास होत नाही. कारण हाच नर्व्हसनेस त्याला तो कोण आहे, तो कोठून आला आहे आणि त्याला काय करायचे आहे याची आठवण करून देतो.