Happy Birthday Nana Patekar | नाना पाटेकरांच्या अभिनय कारकिर्दीत नीलकांती पाटेकरांचाही मोठा वाटा, आर्थिक संकटातही दिली साथ!
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुंबईतील कुलाबा येथे झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले आहे. नाना त्यांच्या सहज अभिनयासाठी ओळखले जातात.
मुंबई : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुंबईतील कुलाबा येथे झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले आहे. नाना त्यांच्या सहज अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीने तर लोकांना अक्षरशः वेड लावले आहे. त्यांचे काही संवाद असे आहेत की, आजही प्रत्येकाच्या तोंडी आहेत. नानांच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…
नाना पाटेकर हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील मुंबईत कापडाचा व्यवसाय करायचे. एक वेळ अशी आली की, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मग नानांनी अभ्यासासोबतच काम करण्याचा विचार केला. ते सकाळी कॉलेजला जायचे आणि मग वेळ मिळताच ते एका जाहिरात एजन्सीसाठी काम करायला लागले.
नीलकांती यांनाही मनोरंजन क्षेत्राची आवड!
कामाच्या दरम्यान नानांची भेट नीलकांती पाटेकर यांच्याशी झाली, ज्या नंतर त्यांच्या पत्नी झाल्या. नीलकांती त्या वेळी बँकेत काम करत होत्या. मात्र, त्यांनाही थिएटरमध्ये रस होता आणि रंगमंचावर सादरीकरण करायचे होते. या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि 1978मध्ये नाना आणि नीलकांती यांचे लग्न झाले. त्यावेळी नानांचे वय 27 वर्षे होते.
अभिनयाने दाखल घ्यायला लावली!
नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. ‘आज की आवाज’, ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘मोहरे’ आणि ‘आवम’ या चित्रपटांमधून सर्वांनीच त्यांच्या अभिनयाची दखल घेतली. मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ मधील नानांच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांची ओळख ‘परिंदा’ या चित्रपटाने झाली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
नीलकांती यांनी दिली साथ!
सुरुवातीच्या काळात नाना पाटेकर फक्त नाटकांत काम करायचे, तेव्हा त्यांना पैशाचीही अडचण होती. एका शोसाठी त्यांना केवळ 75 रुपये मिळायचे. त्याचवेळी पत्नी नीलकांतीचा पगार दरमहा अडीच हजार रुपये होता. एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर म्हणाले होते की, ‘त्या कठीण काळात नीलकांतीने मला सांगितले की, तू पैशाची काळजी करू नकोस आणि तुझे काम मनापासून कर.’ यानंतर नाना पाटेकर यांनी जवळपास दशकभर रंगभूमीवर काम केले. नाना पाटेकर यांच्या मुख्य चित्रपटांमध्ये ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, ‘खामोशी’, ‘यशवंत’, ‘कोहराम’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘टॅक्सी नं. 9211’, ‘वेलकम’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटांची वर्णी लागते.