Happy Birthday Prachi Desai | शालेय दिवसांत शाहिद कपूरची फॅन होती प्राची देसाई, वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी…
बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) आज अर्थात 12 सप्टेंबर रोजी तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीच्या दुनियेतून चित्रपट जगतात प्रवेश करणारी प्राची अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग बनली आहे. प्राचीने वयाच्या 17व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) आज अर्थात 12 सप्टेंबर रोजी तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीच्या दुनियेतून चित्रपट जगतात प्रवेश करणारी प्राची अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग बनली आहे. प्राचीने वयाच्या 17व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. प्राचीच्या कारकिर्दीची सुरुवात एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेने झाली होती, ज्यात ती ‘कपूर’ च्या पात्रात राम कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती.
प्राची या शोचा भाग बनून घरोघरी ओळखली जाऊ लागली. तिने 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसली होती. या चित्रपटानंतर तिने गोविंदासोबत ‘लाइफ पार्टनर’ चित्रपटात काम केले. 2010 मध्ये तिने अजय देवगण, इमरान हाश्मी स्टारर ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्ये काम केले. 2012 मध्ये तिने ‘तेरी मेरी कहानी में’ मध्ये एक कॅमिओ देखील केला होता.
शाहिद कपूर होता क्रश
2012 मध्ये आलेल्या ‘तेरी मेरी कहानी’ या चित्रपटात अभिनेत्री प्राची देसाई आणि अभिनेता शाहिद कपूर यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील होती. अभिनेत्री प्राची देसाई हिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, शालेय जीवनात तिला अभिनेता शाहिद कपूर खूप आवडायचा. पण मोठी झाल्यावर तिला अभिनेता हृतिक रोशन आवडू लागला होता.
प्राचीची कारकीर्द
प्राची देसाईला ‘बोल बच्चन’ या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनच्या बरोबरीने मुख्य भूमिका मिळाली होती, ज्यात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आसिन देखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्राचीचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. 2013 मध्ये, ती जॉन अब्राहम आणि चित्रांगदा सिंग यांच्या समोर ‘आय, मी और मैं’ या चित्रपटामध्ये दिसली होती. यानंतर तिने संजय दत्तसोबत ‘पोलीसगिरी’ या आणखी एका चित्रपटात काम केले होते. 2014 मध्ये ती ‘एक व्हिलन’ चित्रपटात झळकली होती. 2016 मध्ये माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या बायोपिक ‘अझहर’ मध्ये नौरीन, त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात इमरान हाश्मी अझरच्या भूमिकेत होता. तर, ‘रॉक ऑन 2’ मध्ये तिने फरहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
चित्रपटांपासून दूर का राहतेय अभिनेत्री?
टेलिव्हिजनमध्ये यशस्वी कारकीर्दीनंतर चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणाऱ्या अभिनेत्री प्राची देसाईने आघाडीच्या दिग्दर्शकांकडून अपमानित केल्याबद्दल आणि लैंगिकतावादी चित्रपट नाकारल्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अभिनेत्री म्हणते की, इतके दिवस तिला फक्त इंडस्ट्रीमध्ये ‘हॉट’ राहण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते आणि अशा भूमिकांना नाही म्हणल्याने चित्रपटसृष्टीत तिची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली.
प्राचीने एका आघाडीच्या दैनिकाला सांगितले की, ‘मला कधीही सेक्सिस्ट चित्रपट करायचे नव्हते. आणि या उद्योगात, मी या कल्पनेशी बराच काळ संघर्ष केला आहे. लोकांना मी ‘हॉट’ व्हावे, असे वाटत होते. मला अनेक पुरुष निर्माते आणि दिग्दर्शकांकडून असाच अभिप्राय मिळाला की, मी हॉट दिसले तरच, मला काम मिळेल. म्हणून, मी कमी काम निवडले आणि दूर राहणे पसंत केले.’
हेही वाचा :
आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी!